धरणाखालील गावांसाठी ‘माणिकडोह’चे नियोजन हवे  

दत्ता म्हसकर 
शनिवार, 12 मे 2018

जुन्नर - यावर्षी चांगला पाऊस झाल्याने माणिकडोह धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत समाधानकारक पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. धरणाखाली असणाऱ्या गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही, यासाठी शिल्लक पाण्याचे सुयोग्य नियोजन आवश्‍यक आहे. मात्र, ते न झाल्यास मागील वर्षाप्रमाणे टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. मागील वर्षी धरणाच्या पाण्याचे नियोजन झाले नाही.  त्यामुळे मे अखेर टंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. 

जुन्नर - यावर्षी चांगला पाऊस झाल्याने माणिकडोह धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत समाधानकारक पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. धरणाखाली असणाऱ्या गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही, यासाठी शिल्लक पाण्याचे सुयोग्य नियोजन आवश्‍यक आहे. मात्र, ते न झाल्यास मागील वर्षाप्रमाणे टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. मागील वर्षी धरणाच्या पाण्याचे नियोजन झाले नाही.  त्यामुळे मे अखेर टंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. 

शेतातील उभी पिके पाण्याअभावी जळून गेली.  या वर्षी चांगला पाऊस पडूनसुद्धा नियोजनाअभावी दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना धरणाखालील खामगाव, माणिकडोह, पाडळी, पिंपळगाव सिद्धनाथ, गोळेगाव, अलदरे येथील स्थानिक शेतकऱ्यांना करावा लागत आहे. धरणातून आत्तापर्यंत दोन आवर्तने देण्यात आली आहेत. पाहिले ४५ दिवस सुरू होते तर १४ दिवसांचे दुसरे ७ मेला बंद झाले आहे. सध्या धरणात ९२३ दशलक्ष घनफूट (९.०७%) इतका पाणी साठा आहे. धरणातून पाणी सोडलं तर डायरेक्‍ट महिनाभर आवर्तन सुरू राहते. 

पाणी बंद केल्यावर सगळचं पाणी बंद होते. पाणी बंद झालं की धरणाखालील गावांमधील ज्यांच्या नदीच्या पाण्यावर विद्युत मोटारी आहेत. त्यांचा पिण्याच्या पाण्याचा तसेच सिंचनाचा प्रश्‍न निर्माण होतो. या वर्षी उन्हाळा तीव्र स्वरूपाचा आहे. शेतकऱ्यांची उसाची पिके पाण्याअभावी वाळून जात आहे, अशी शेतकरीवर्गाची ओरड आहे. आमच्या जमिनी जाऊन आम्हालाच पाणी नाही हां कुठला न्याय असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. पाणी खाली गेल्याने पश्‍चिम आदिवासी भागातील गावांनादेखील पाणीटंचाई भेडसावत आहे. मागील वर्षी तालुक्‍याचे आमदार शरद सोनवणे यांनी येऊन पाहणी केली होती व बंधारा टाकण्याचा शब्द दिला होता. परंतु कार्यवाही काही झाली नाही. 

या वर्षीदेखील परिस्थिती जैसे थे आहे. अधिकाऱ्याशी संपर्क केला असता समाधानकारक उत्तर मिळत नाही. 

माणिकडोह (ता. जुन्नर) येथील शहाजी सागर जलाशयाची पाणी साठवण क्षमता १० हजार ८८० दशलक्ष घनफूट आहे. या वर्षी एकूण १ हजार २३७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जलाशयात ८ हजार २५० दशलक्ष घनफूट नवीन पाणी आले. एकूण उपयुक्त पाणीसाठा ८ हजार ४८४ दशलक्ष घनफूट होता. धरणाची टक्केवारी ८३.३८ होती. दोन आवर्तनानंतर शुक्रवारी (ता. ११) अखेर उपयुक्त पाणीसाठा ९२३ दशलक्ष घनफूट इतका असून गेल्या वर्षी तो ३४७ दशलक्ष घनफूट एवढा होता. 
- काशिनाथ देवकर, शाखा अभियंता 

माणिकडोह धरणाचे पाणी रोज थोडे थोडे का होईना आम्हाला पण मिळावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहेत. माणिकडोह धरणातून शिरोलीपर्यंतच्या गावासाठी शिल्लक पाणीसाठ्यातून पाणी सोडण्याचे नियोजन करावे. 
- अजिंक्‍य घोलप, सदस्य, खामगाव ग्रामपंचायत 

Web Title: Manikdoh dam planning