मंत्रिमंडळ विस्तारात परिषद निवडणुकांचे विघ्न

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 23 एप्रिल 2018

मुंबई - महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार, अशा चर्चांना उधाण येत असले, तरी या आघाडीवरच्या सामसुमीला आता विधान परिषद निवडणुकांचे कारण मिळाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून परिषदेवर पाठवल्या जाणाऱ्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकांच्या आचारसंहितेत मंत्रिमंडळ विस्तार बसतो का बसत नाही, अशी चर्चा सुरू आहे. पण प्रत्यक्षात विस्ताराच्या हालचाली सध्या सुरू नसल्याचे समजते. शिवसेनेने केलेली विधाने, तसेच आशीष शेलार वगळता अन्य कोणताही महत्त्वाचा आमदार मंत्रिमंडळाबाहेर नसल्याने विस्ताराबाबत कोणत्याही हालचाली सुरू नाहीत. परिषद निवडणुकीत दोन- तीन जिल्ह्यांचे संयुक्‍त मतदारसंघ असल्याने परस्परांशी वाद असलेल्या मंत्र्यांना एकत्र ठेवणे ही मुख्यमंत्री तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासमोरची समस्या असल्याने आताच विस्ताराचा निर्णय होणार नाही, असे समजते.

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांचा मंत्रिमंडळात समावेश व्हावा यासाठी पक्षातला एक गट आग्रही आहे. शेलार यांनी मुंबई पालिकेच्या निवडणुकीत मिळवून दिलेले यश लक्षात घेता त्यांना संधी द्यायला हवी, असे मानले जाते. मात्र, त्याच वेळी मंगलप्रभात लोढा, आता प्रतोद झालेले राज पुरोहित यांचीही नावे मंत्रिपदासाठी पुढे केली जात आहेत. त्यातच शेलार यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप करणाऱ्या काही तक्रारी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय असतात. त्यामुळे शेलार यांच्या प्रवेशाबाबत कायम संभ्रम असतो. शेलार वगळता पक्षाला पुढे नेऊ शकणारे आणि जात-पंथ समीकरणात बसणारा एकही आमदार मंत्रिमंडळाबाहेर नाही, त्यामुळे सध्याच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणतीही घाई करण्याची गरज पक्षनेतृत्वाला वाटत नाही.

एक महिन्याने होणार विस्तार?
विस्ताराकडे नजर लावून बसलेले अर्धा डझन आमदार पक्षात आहेत. अधूनमधून चर्चेत येणारी विस्ताराची बातमी त्यांना प्रत्यक्षात यावी असे वाटते. नारायण राणे यांची राज्यसभेवर वर्णी लागल्याने शिवसेना मंत्रिमंडळ विस्ताराला परवानगी देईल, असे मानणारा वर्ग आहे. त्यामुळेच एप्रिल महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विस्ताराची चर्चा सुरू करतील, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र आता विधान परिषदेवर अधिकाधिक जागा निवडून याव्यात या प्रयत्नांकडे लक्ष देण्याचे कारण सांगत विस्तार पुन्हा एकदा रखडण्याची चिन्हे आहेत. एका ज्येष्ठ मंत्र्याने विस्तार एक महिन्याने होईल, असे उत्तर दिले.

Web Title: mantrimandal development council election