कारखानदारांचा इथेनॉल निर्मितीकडे कल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

सोलापूर - सरकारने ठरवून दिलेल्या कोट्यानुसार साखर विक्री करणे, साखरेचे अस्थिर दर यावर उपाय म्हणून कारखानदारांचा कल आता इथेनॉल निर्मितीकडे वाढत आहे. उसापासून थेट इथेनॉल तयार करण्याला केंद्र सरकारने साखर कारखान्यांना परवानगी दिली असून, इथेनॉल प्रकल्प उभारणीच्या कर्जावरील व्याजही सरकारकडून भरले जाणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्यात यंदा सात नवे प्रकल्प उभारले जात आहेत. दुसरीकडे दुष्काळामुळे यंदा साखरेचे उत्पादन 35 टक्‍क्‍यांनी घटेल, असा अंदाज आयुक्‍तालयाने व्यक्‍त केला आहे.

देशात पेट्रोलमध्ये 10 टक्‍के इथेनॉल मिसळण्याला परवानगी आहे. पंरतु, कमी उपलब्धतेमुळे केवळ चार टक्‍केच इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळले जाते. इथेनॉल निर्मितीमुळे अतिरिक्‍त साखर उत्पादनावर नियंत्रण येणार असून, शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा आहे. यंदा शरद सहकारी व डी. वाय. पाटील कारखाना (कोल्हापूर), विठ्ठलराव शिंदे कारखाना (सोलापूर), शिवाजीराव नागवडे कारखाना (नगर), हुतात्मा नाईकवाडी कारखाना (सांगली), छत्रपती माजलगाव कारखाना (बीड) आणि रामेश्‍वर कारखाना (जालना) या कारखान्यांचे इथेनॉल प्रकल्प सुरू होणार असल्याचे साखर आयुक्‍तालयाकडून सांगण्यात आले.

साखर उत्पादनात 51.92 लाख मे. टनाची घट
राज्यात यंदा 184 साखर कारखान्यांकडून गाळप सुरू आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी साखर आयुक्‍तालयाकडून 942 लाख मे. टन उसाचे गाळप होईल आणि त्यातून 206.65 लाख मे. टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्‍त करण्यात आला. त्यानुसार आतापर्यंत 65 लाख मे. टन साखरेचे उत्पादन अपेक्षित होते, परंतु सध्या 37.21 लाख मे.टन साखर उत्पादित झाली आहे. राज्यातील दुष्काळामुळे बहुतांशी उसाचा वापर शेतकरी चाऱ्यासाठी करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे यंदा साखरेचे उत्पादन घटत आहे.

राज्यातील गाळपाची सद्यस्थिती
उसाचे अपेक्षित गाळप 742 लाख मे.टन
अपेक्षित साखर उत्पादन 154.73 लाख मे. टन
आतापर्यंतचे गाळप 389.86 लाख मे. टन
उत्पादित साखर 37.91 लाख मे.टन

Web Title: Manufacturer ethanol making