मुंबईत 31 ला धडकणार मराठा क्रांती मूक महामोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

औरंगाबाद - राज्यभरात लाखोंचे मूक मोर्चे निघाल्यानंतरही मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चा समन्वयक सदस्यांनी येत्या 31 जानेवारीला मुंबईत महामोर्चा काढण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे, या मोर्चानंतर थेट राज्यपालांना निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांचाच निषेध नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

औरंगाबाद - राज्यभरात लाखोंचे मूक मोर्चे निघाल्यानंतरही मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चा समन्वयक सदस्यांनी येत्या 31 जानेवारीला मुंबईत महामोर्चा काढण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे, या मोर्चानंतर थेट राज्यपालांना निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांचाच निषेध नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी म्हणाले, की गेल्या साडेपाच महिन्यांमध्ये जिल्हा, तालुका अशा स्तरावर लाखोंचे मूक मोर्चे काढण्यात आले. मात्र त्यामागील भावना अद्यापही शासनाला समजली नाही. आतापर्यंत जवळपास 30 जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत निवेदने पोचली आहेत. मात्र त्याबाबत कुठलाही निर्णय त्यांनी घेतला नाही. खरे तर आरक्षणाची घोषणा त्यांनी केली असती, तर कदाचित हा मोर्चा काढण्याची गरज पडली नसती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे मुंबईत महामोर्चाचे नियोजन केले आहे. भायखळा येथील वीर जिजाऊ माता उद्यानापासून दुपारी एकला काढण्यात येणारा मोर्चा आझाद मैदानावर जाईल. त्यानंतर एक शिष्टमंडळ राज्यपालांना निवेदन सादर करेल. या मोर्चानंतरही दुर्लक्ष केल्यास पुढील दिशा ठरविली जाईल. मुंबईनंतरचे मोर्चे हे मूक नसतील, हे निश्‍चित आहे. असेही या वेळी सांगण्यात आले. 

तर आगामी निवडणुकीत परिणाम भोगा 
या मोर्चाचे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत परिणाम झाले नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. याकडे लक्ष वेधले असता, पदाधिकारी म्हणाले, की कुणाला मदत करा, कुणाला करू नका, असे आम्ही कुणालाही सांगितले नव्हते. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात काहीही अर्थ नाही. मात्र मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आता आगामी निवडणुकीत नक्‍कीच त्याचे परिणाम दिसतील, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले. 
नावे टाकू नयेत 

मराठा क्रांती मोर्चाला कोणताही चेहरा नाही. त्यामुळे आजवरच्या मोर्चात सहभागी झालेल्यांनी नावे देणे टाळले. काहींनी श्रेयासाठी केलेला आटापीटा त्यांच्या अंगलट आला. तरीही काही ठिकाणी काही जणांचीच नावे छापली गेली. त्याबद्दल बहुतांशी समन्वयकांनी नाराजी दाखवली. म्हणून आम्ही आजवर आवर्जून नावे देणे टाळत आलो आहोत, असे या वेळी सांगण्यात आले.

Web Title: maratha kranti morcha 31st in mumbai