Maratha Kranti Morcha : मराठा समाजाचा दिवाळीत स्वतंत्र पक्ष - सुरेश पाटील

Suresh-Patil
Suresh-Patil

पुणे - आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला मराठा समाज स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापण्यासाठी पुन्हा एकत्र येणार आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर रायरेश्‍वराच्या मंदिरात समाजाच्या पक्षाची स्थापना करण्यात येईल, अशी माहिती  मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. 

आघाडी सरकारने मराठा समाजाची निराशा केल्याने मोठ्या आशेने भाजप-सेनेला सत्ता दिली होती; पण युती सरकारने मराठा आरक्षणाबाबत न्यायालयात आपली भूमिका प्रबळपणे मांडली नाही. त्यामुळे समाजाला आरक्षण मिळाले नसल्याची टीका पाटील यांनी केली. सर्व पक्षांनी समाजाकडे फक्त निवडणुका जिंकण्यापुरतेच पाहिले; पण आता मराठा समाजातील सर्व घटकांना एकत्र करत नवीन पक्ष स्थापण्यात येणार आहे, असे पाटील यांनी सांगितले. 

‘‘नव्याने काढण्यात येणाऱ्या पक्षाला कोणीही अध्यक्ष असणार नाही. या पक्षात शंभर जणांची कोअर कमिटी असून, त्यात निवृत्त आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. आजी-माजी २० आमदार आमच्या संपर्कात आहेत,’’ असे पाटील यांनी सांगितले. या वेळी वैशाली जाधव, परेश भोसले, रूपाली पाटील आदी उपस्थित होते.

उदयनराजे यांना जाहीर पाठिंबा
साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना या पक्षाने उमेदवारी दिली किंवा नाही दिली, तरी त्यांना पाठिंबा दिला जाईल. तसेच उदयनराजे कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढले, तरी त्यांना पाठिंबा देणार असल्याचे पाटील यांनी जाहीर केले. मराठा समाजाच्या नवीन पक्षाचे नेतृत्व उदयनराजे यांनी करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com