सासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

सासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य समन्वयक समितीतर्फे आज ठिय्या आंदोलनाचे रूपांतर ‘संवाद यात्रे’त करण्यात आले. ही यात्रा पुढे दहा दिवस चालून मुंबईत मोर्चाच्या रूपात धडकेल. मराठा समाजाच्या आरक्षणासह शिक्षण, नोकरी, व्यवसायाबाबत जनजागृती करण्यासाठी ही संवाद यात्रा असल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले.

या यात्रेच्या प्रारंभी शाहीर राजेंद्र कडूसकर यांनी पोवाडे गायले. त्यासह गीत व व्याख्यान रंगले. सासवडच्या ठिय्या आंदोलनात सलग १०० दिवस सहभागी होऊन नियोजन केल्याबद्दल स्नेहल काकडे आणि स्वप्नील गायकवाड यांचा; तर आरक्षणासाठी पायी वारी केलेल्या रामभाऊ गुंड यांचा सन्मान झाला. समन्वयक रामभाऊ चित्रे यांनी संवाद यात्रेची रूपरेषा सांगितली. नीलेश जगताप यांनी सूत्रसंचालन केले. राज्य समन्वयक समितीचे सदस्य, पुरंदर तालुक्‍यातील मराठा बांधव या वेळी चौकात मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी समन्वयक राजेंद्र कोंढरे म्हणाले, ‘‘अगदी शिस्तबद्ध काढलेल्या मराठा बांधवांच्या लाखोंच्या मोर्चाच्या भावनांची दखल घेऊन आरक्षणासह इतर मागण्यांचा प्रश्न निकाली काढावा. खरे तर घटनात्मक आरक्षण देणे गरजेचे आहे.’’ 

डॉ. बुधाजीराव मुळीक म्हणाले, ‘‘मागासलेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी आंदोलनाची ही धग कायम पेटती ठेवण्याची गरज आहे. बहुतांशी मराठा शेतकरी असून, सरकारने शेतमालाला हमीभाव आणि शेतकऱ्यांना निवृत्तिवेतन द्यावे.’’ 

समन्वयक शांताराम कुंजीर म्हणाले, ‘‘मराठा समाजाच्या मुला-मुलींसाठी शैक्षणिक प्रवेश, शुल्काबाबतच्या अडचणी, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, महिलांची सुरक्षितता यासाठी लोकशाही पद्धतीने आंदोलन सुरू केले.’’  

दरम्यान, आज ‘संवाद यात्रा’ सासवडहून पुढे बारामतीकडे गेली.  

ठिय्या आंदोलन संस्मरणीय...
तब्बल १०० दिवसांचे सासवडचे सकल मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन संस्मरणीय ठरले. या भागातील हे इतक्‍या दिवस चाललेले पहिलेच आंदोलन म्हणावे लागेल. यात ९० हून अधिक गावचे लोक पक्षभेद सोडून सहभागी झाले. अगदी बैलगाड्यांनीही लोक आले. आंदोलनात पुंगी बजाओ, गाजर दाखवा, घंटानाद, भारूड, वाघ्या-मुरळींचा जागर, भजन अशा स्वरूपांत आंदोलन पुढे जात राहिले. आंदोलनाचे आज संवाद यात्रेत रूपांतर झाले. 

Web Title: Maratha kranti morcha saswad sanvad yatra