मराठा क्रांती मोर्चाची मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक

अतुल पाटील
सोमवार, 23 जुलै 2018

मराठा आरक्षणासाठी कानडगाव (ता. गंगापुर) येथील काकासाहेब शिंदे या 28 वर्षीय तरुणाने जलसमाधी घेतल्याने मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी (ता. 24) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. दरम्यान, पंढरीच्या वारकऱ्यांना परतीच्या प्रवासात कोणतीही इजा होऊ नये, तसेच त्यांची वाहने, एसटी टार्गेट करु नये, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चातर्फे समन्वयकांनी केले आहे. 

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी कानडगाव (ता. गंगापुर) येथील काकासाहेब शिंदे या 28 वर्षीय तरुणाने जलसमाधी घेतल्याने मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी (ता. 24) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. दरम्यान, पंढरीच्या वारकऱ्यांना परतीच्या प्रवासात कोणतीही इजा होऊ नये, तसेच त्यांची वाहने, एसटी टार्गेट करु नये, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चातर्फे समन्वयकांनी केले आहे. 

कानडगावच्या घटनेनंतर औरंगाबादच्या समन्वयकांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. घटनेला जबाबदार असलेल्या संबंधित तहसील कार्यालय, पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना निलंबित करावे. त्यांच्यावर 302 कलमान्वये कारवाई करावी. मोर्चाचे समन्वयक मंगळवारी (ता. 24) सकाळी क्रांती चौक पोलीस ठाण्यातही गुन्हा नोंद करणार आहेत. क्रांती चौकातील ठिय्या आंदोलन शांततेत सुरुच राहणार असल्याचे समन्वयकांनी स्पष्ट करण्यात आले. 

क्रांती चौकात सायंकाळी चार वाजेनंतर कार्यकर्त्यांनी जमायला सुरवात केली होती. सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेले होते. फडणवीस हाय-हाय याप्रकारच्या घोषणा दिल्या. क्रांती चौकातील दुकाने तसेच जयभवानीनगर, गजानन महाराज मंदीर परिसरातील दुकानेही आंदोलकांनी बंद केले. रात्री पावणे आठच्या सुमारास काही तरुणांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळा त्याठिकाणी आणला होता. आंदोलकांनी त्यावर यथेच्छ धुलाई केली. चपलेने झोडपत जोरदार घोषणाबाजी केली. 
 
मुख्यमंत्री फडणवीस राजीनामा द्या.. 
तुळजापुर आणि परळीतील उद्रेक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळायला हवा होता. गृहमंत्री म्हणूनही ते निष्काम ठरल्याने त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. तत्पुर्वी मराठा आरक्षण मिळेपर्यंत मेगा भरती सरकारने तत्काळ रद्द करावी. समाजाचा अंत संपला असून तत्काळ निर्णय घ्यावा, असे मोर्चाच्या समन्वयकांनी सांगितले.

Web Title: maratha morcha declares Maharashtra band on Tuesday