'एक मराठा लाख मराठा' घोषणा देत अॅड. सदावर्तेंवर प्राणघातक हल्ला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

वैद्यनाथ पाटील कोणासोबत आला होता का किंवा तो मराठा समर्थक संघटनेचा सदस्य होता का हे अद्याप उघड झाले नाही परंतु जर यात तथ्य असेल तर पाटील याला कायदेशीर मदत देणार अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण कार्यकर्ते विनोद पाटील यांनी दिली. दरम्यान, सध्या पोलिसांनी उच्च न्यायालयातील बंदोबस्त वाढविला आहे.तर गुणरत्न सदावर्ते यांना पोलिस संरक्षण दिले जाईल असे आश्‍वासन राज्य सरकारने दिले.

मुंबई : मराठा आरक्षणाविरोधी याचिका दाखल करणारे ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना आज उच्च न्यायालयाच्या परिसरात मारहाण करण्यात आली. उच्च न्यायालयातील सुनावणी संपवून प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी सदावर्ते बाहेर आले होते. जालनाचे रहिवासी असलेल्या वैदयनाथ पाटील यांनी हा हल्ला केला.

दरम्यान, पाटील यांना आझाद मैदान पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर सदावर्ते हे हल्ल्याची माहिती देण्यासाठी मुख्य न्यायमुर्तींच्या दालनात गेले आहे. सदावर्ते यांचा चष्मा फुटला असून त्यांना किती इजा झाली आहे याची अद्याप माहिती कळली नाही. दरम्यान, सदावर्ते यांनीच प्रसिद्धी मिळविण्यासाठी हा हल्ला घडवून आणला आहे, असा दावा मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ काही कार्यकर्त्यांनी केल्याची चर्चा न्यायालयात उपस्थित असलेल्या मराठा आरक्षण समर्थनार्थ कार्यकर्ते कोल्हापूरचे दिलीप पाटील यांनी केला. 

उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या विरोधी दाखल असलेल्या याचिकेवर मुख्य न्या. नरेश पाटील आणि न्या. एम.एस.कर्णिक यांच्या खंडपीठासमोर झाली. दोन्ही पक्षाच्या वकीलांची फौज, इतर सुनावणीचे वकील, विविध याचिकाकर्ते, सरकारी अधिकारी, कर्मचारी, सामान्य नागरिक, मराठा आरक्षण समर्थनार्थ आणि विरोधक यांमुळे कोर्ट रु. नं 52 खचाखच भरले होते. मुंगी शिरायलाही जागा नाही अशी परिस्थितीत आजची मराठा आरक्षणाची सुनावणी पार पडली. राज्य सरकारने लागू केलेल्या मेगाभरतीबाबत हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तर न्यायालयाने सांगितलेतर आम्ही मागासवर्ग आयोगाचा अहवाल जाहीर करण्याचा विचार करू पण तसे आताच आम्ही आश्‍वासन देऊ शकत नाही अशी भूमिका राज्य सरकारने घेतली.

या प्रकरणाला स्थगिती द्यावी अशी मागणी सदावर्ते यांनी केली. मात्र, त्यास खंडपीठाने नकार दिला. दरम्यान, सदावर्ते यांनी गेल्या सोमवारपासून हजारहून अधिक धमक्‍या आपल्याला फोनवरून मिळाल्या आहेत, तसेच आपल्या घराची, कार्यालयाची रेकी केली जात आहे, काही अज्ञात व्यक्तींनी आपला पाठलाग केला असल्याची माहिती त्यांनी खंडपीठाला दिली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल केली असल्याची माहिती त्यांनी खंडपीठाला दिली. यानंतर प्रसारमाध्यमांना सुनावणीची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यासाठी ते उच्च न्यायालयातील विद्यापीठासमोरील प्रवेशद्वाराजवळ आले. प्रतिक्रिया देऊन झाल्यानंतर पुन्हा न्यायालयात जाण्यासाठी वळताना, वैद्यनाथ पाटील यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यांची कॉलर पकडली व हाताने ठोसे लगावले.

दोन-चार ठोश्‍यामुळे ऍड. गुणवर्ते यांचा चष्मा खाली पडला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे गुणवर्ते यांना प्रतिकार करता आला नाही परंतु त्यांच्या सोबत असलेल्या काही वकिलांनी त्याला फटकावले. तरीही एक मराठा लाख मराठा अशा घोषणा वैद्यनाथ पाटील देतच होते. याप्रवेशद्वाराजवळ असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करत, लगेचच पाटीलला ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काही प्रसारमाध्यमांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याने सदावर्ते यांना अपशब्द वापरत, एकमराठा लाख मराठा अशा घोषणाही दिल्या. 

वैद्यनाथ पाटील कोणासोबत आला होता का किंवा तो मराठा समर्थक संघटनेचा सदस्य होता का हे अद्याप उघड झाले नाही परंतु जर यात तथ्य असेल तर पाटील याला कायदेशीर मदत देणार अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण कार्यकर्ते विनोद पाटील यांनी दिली. दरम्यान, सध्या पोलिसांनी उच्च न्यायालयातील बंदोबस्त वाढविला आहे.तर गुणरत्न सदावर्ते यांना पोलिस संरक्षण दिले जाईल असे आश्‍वासन राज्य सरकारने दिले.

Web Title: Maratha Reservation petition Gunratna Sadavarte beaten at Court