'सरकारनेच आमच्या हातात दगड दिला'; मुंबईतील बंद मागे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

सरकारनेच आमच्या हातात दगड दिला आहे. आम्ही गेल्या वर्षात राज्यभर शांततेत मोर्चे काढले. परंतु, त्याची सरकारकडून कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. सरकारनेच आम्हाला हातात दगड घ्यायला भाग पाडले आहे. या हिंसक गोष्टींना सर्वस्वी सरकार जबाबदार आहे, असे मत आज मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समन्वयक विरेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेदरम्यान व्यक्त केले. तसेच त्यांनी यावेळी मुंबईतील बंद मागे घेत असल्याचे सांगितले.

मुंबई : सरकारनेच आमच्या हातात दगड दिला आहे. आम्ही गेल्या वर्षात राज्यभर शांततेत मोर्चे काढले. परंतु, त्याची सरकारकडून कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. सरकारनेच आम्हाला हातात दगड घ्यायला भाग पाडले आहे. या हिंसक गोष्टींना सर्वस्वी सरकार जबाबदार आहे, असे मत आज मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समन्वयक विरेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेदरम्यान व्यक्त केले. तसेच त्यांनी यावेळी मुंबईतील बंद मागे घेत असल्याचे सांगितले.

#MarathaKrantiMorcha

नवी मुंबई, ठाणे, रायगड व पालघर या परिसरातील बंद अद्याप मागे घेतला नसल्याचे स्थानिक समन्वयकांनी स्पष्ट केले आहे. दादर येथील शिवाजी मंदिर येथे मुंबई क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची बैठक झाली. यामधे मुंबई बंद स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला . गेल्या वर्षात राज्यभर मोर्चे काढूनही सरकारने लक्ष दिले नाही आणि त्यामुळेच आता मुक नाही तर ठोक मोर्चे काढायची वेळ आली आहे हे सरकारनेच दाखवले आहे. दोन वर्षे काम केल्यानंतर जर काहीच पदरात पडत नसेल तर ही सर्वात मोठी शोकांतिका असल्याचेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

आज दिवसभर मुंबईत मराठा क्रांती मोर्चातर्फे बंद पाळण्यात आला होता, आणि या बंदमुळे कोणाला त्रास झाला असेल तर त्या लोकांची माफी मागून, तो स्थगित करण्यात येत असल्याचे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच, ठाणे, मुंबई आणि उपनगरामध्ये शांतता राखण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. तसेच ठाणे आणि उपनगरातील मोर्चा स्थगित करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. 

मराठा क्रांती मोर्चातर्फे आज महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर मराठा समाजातील सर्व स्तरातील लोकांनी ठरवून घेतलेला हा निर्णय होता. आज मराठा समाजाने मुंबई फक्त कुठला पक्षच नाही तर एखादा समाजही मुंबई बंद करु शकतो हे दाखवून दिले आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: MarathaKrantiMorcha The government has given us stones in our hands says maratha morcha