#MarathaKrantiMorcha ‘महाराष्ट्र बंद’ आजच; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी (ता. २४) ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. जुने कायगावच्या घटनेनंतर औरंगाबादच्या समन्वयकांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. घटनेला जबाबदार असलेल्या संबंधित तहसील कार्यालय, पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना निलंबित करावे, त्यांच्यावर ३०२ कलमान्वये कारवाई करावी, अशा मागण्या त्यांनी केल्या. काकासाहेब शिंदे यांना हुतात्मा घोषित करा, कुटुंबीयांना ५० लाखांची मदत द्या, अशाही मागण्या समन्वयकांनी केल्या आहेत.

मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी (ता. २४) ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. जुने कायगावच्या घटनेनंतर औरंगाबादच्या समन्वयकांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. घटनेला जबाबदार असलेल्या संबंधित तहसील कार्यालय, पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना निलंबित करावे, त्यांच्यावर ३०२ कलमान्वये कारवाई करावी, अशा मागण्या त्यांनी केल्या. काकासाहेब शिंदे यांना हुतात्मा घोषित करा, कुटुंबीयांना ५० लाखांची मदत द्या, अशाही मागण्या समन्वयकांनी केल्या आहेत.

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांना पूजा करण्यापासून रोखल्यानंतर आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. मराठा समाजाला एकटे पाडून राजकीय धुव्रीकरण करण्याचा डाव मुख्यमंत्री खेळत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केला आहे. तर, युवकाची आत्महत्या हा पोलिस प्रशासनाचा निष्काळजीपणा असल्याची टीका ‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

मराठा आरक्षणासह अन्य विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे मराठवाड्यात दुसऱ्या टप्प्यात ठिकठिकाणी आंदोलने होत असून त्याची धग वाढती आहे. सकल मराठा समाजातर्फे औरंगाबाद-पुणे महामार्गावरील जुने कायगावमधील गोदावरी नदीवरील पुलापासून अर्धा किलोमीटरवर सकाळी ठिय्या आंदोलन सुरू केले. तत्पूर्वी या आंदोलकांनी जलसमाधीचा इशारा दिला होता. ठिय्या आंदोलनादरम्यान सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू होती. मागण्या मान्य करण्याच्या मुद्यावरून आंदोलक संतप्त झाले आणि ते दुपारी तीनच्या सुमारास गोदावरी नदीकडे आले. पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तावडीतून सुटून काकासाहेब दत्तात्रय शिंदे (रा. कानडगाव, ता. गंगापूर) याने नदीत उडी घेतली. त्याला वाचविण्यासाठी स्थानिक बचाव पथक, ग्रामस्थ धावले. आंदोलक समजून पोलिसांनी त्यांनाही अडवले. तोपर्यंत काकासाहेब पुरातून एक हजार फुटांपर्यंत वाहून गेला. दशरथ बिरुटे यांनी उडी मारून त्याला पाण्याबाहेर काढले. नंतर त्याला गंगापूर उपजिल्हा रुग्णालय येथे नेले. तेथील डॉक्‍टरांनी तपासून काकासाहेबला मृत घोषित केले.

तरुणाने गोदावरीत आत्महत्या केल्याचे कळताच आंदोलनकर्ते आणखी संतप्त झाले. त्यांनी औरंगाबाद- नगर महामार्गावर चक्का जाम आंदोलन सुरू केले. उपजिल्हाधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी घटनास्थळी धाव घेतली. काकासाहेबच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, शासनाचा ठोस निर्णय आल्यावरच आम्ही माघार घेऊ, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

काकासाहेब होता चालक
काकासाहेबच्या मागे आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. त्याचे शिक्षण दहावीपर्यंत झाले होते. तो घरात मोठा होता. तो अविवाहीत होता. या कुटुंबाची एक ते दीड एकर शेती असून शिवसेनेचे माजी आमदार अण्णासाहेब माने, युवासेना जिल्हा प्रमुख संतोष माने यांच्या वाहनावर तो चालक म्हणून काम करत होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #MarathaKrantiMorcha maharashtra close kakasaheb shinde maratha reservation