#MarathaKrantiMorcha उद्या महाराष्ट्र बंद

Maharashtra close tomorrow
Maharashtra close tomorrow

मुंबई - आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेल्या मराठा आंदोलनाला दोन वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने उद्या 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मात्र या बंदमधून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परळीला वगळण्यात आले असून या चारही ठिकाणी केवळ ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचं आंदोलकांनी जाहीर केलं आहे. 

मराठा आंदोलक आणि ठाणे पोलिसांदरम्यान आज एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परळीला उद्याच्या महाराष्ट्र बंदमधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. वारंवार लोकांना वेठीस धरणं योग्य नसल्याचं सांगत या चारही शहरांना बंदमधून वगळण्याचा आणि या शहरांमध्ये केवळ ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, राज्यात गेल्या 21 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलने सुरू आहेत. या दरम्यान अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळणही लागले होते. त्यामुळे उद्याच्या बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यभर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सोलापूर, पुणे, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, लातूर आणि रायगड आदी ठिकाणी सर्वाधिक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. आधीच राज्यसरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने उद्याच्या बंदमुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे. 

उद्या होणारा बंद शांततेत पार पाडण्याचं आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी केलं आहे. आंदोलनावेळी कोणतीही हिंसा होणार नाही, मात्र आंदोलनावेळी आम्ही सरकारशी असहकार करू, असं गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका
'उद्या बंद असल्याने मुंबईत कर्फ्यू सदृश्य परिस्थिती असणार आहे. कडकडीत बंद पुकारण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल पंपापासून मॉलपर्यंत आणि रिक्षापासून ते बसेसपर्यंत सर्व वाहतूक बंद असेल, असे मेसेज सध्या सोशल मीडियावरून फिरवले जात आहेत. एवढंच नव्हे तर नागरिकांनी आजच सर्व आवश्यक वस्तूंची खरेदी करावी, अशा सूचनाही मेसेजवरून दिल्या जात आहेत. हे सर्व मेसेज खोटे असून उद्या मुंबईतील जनजीवन सुरळीत सुरू राहील,' असं सकल मराठा समाजानं स्पष्ट केलं आहे. 'मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परळीतील बंदबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका', असं आवाहनही करण्यात आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com