पंकजा मुंडे यांची काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूनंतर भावनिक पोस्ट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

'माझ्या भेटींसाठी परळीत येणाऱ्याना नम्र विनंती कृपया कोणीही भेटी, पुष्पहार, गुच्छ,केक, सत्कार साहित्य आणू नये. भावानो स्वतःचा जीव नका रे देऊ आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्याला समोर ठेवा वाघानो...' असे भावनिक आवाहनही या पोस्टद्वारे पंकजा मुंडे यांनी केले आहे. 

मुंबई : मराठा क्रांती मोर्चाने राज्यभरात आता आक्रमक रुप धारण केले आहे. औरंगाबाद येथील कायगावात गोदावरीत उडी घेऊन काकासाहेब शिंदे या 28 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. काल विष प्राशन केलेल्या जगन्नाथ सोनवणे या आंदोलनकर्त्याचाही आज मृत्यू झाला. आज मुंबईतही बंदची हाक दिली आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांची आतापर्यंत काहीही प्रतिक्रिया आलेली नसताना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुक द्वारे एक भावुक पोस्ट लिहीली आहे. 

पंकजा मुंडे यांचा उद्या वाढदिवस आहे. पण औरंगाबादमधील या घटनेने आपण वाढदिवस साजरा करणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूवर पंकजा मुंडे यांनी खेद व्यक्त करत 'माझ्या राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे याचं समर्थन मुंडे साहेबांनीही केलं होतं व आम्हीही करतो. ते मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत व ओ बी सी वर कुठलाही अन्याय झाला नाही पाहिजे ही भूमिका मराठा समाजाची देखील आहेच व माझी ही आहे.' असे म्हटले आहे. 

'माझ्या भेटींसाठी परळीत येणाऱ्याना नम्र विनंती कृपया कोणीही भेटी, पुष्पहार, गुच्छ,केक, सत्कार साहित्य आणू नये. भावानो स्वतःचा जीव नका रे देऊ आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्याला समोर ठेवा वाघानो...' असे भावनिक आवाहनही या पोस्टद्वारे पंकजा मुंडे यांनी केले आहे. 
 
आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: MarathaKrantiMorcha Pankaja Munde Posted A Emotional Post on Facebook