यंदाची दिवाळी मराठी कलाकारांची; पाहा कोण कोण पडद्यावर धुमाकूळ घालणार

संतोष भिंगार्डे  
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

यंदाच्या दिवाळीत रुपेरी पडद्यावर मराठीचा धूमधडाका पाहायला मिळणार आहे. बॉलिवूडच्या ‘हाउसफुल ४’, ‘मेड इन चायना’ आणि ‘सांड की आँख’ या चित्रपटांच्या बरोबरीने मराठी ‘ट्रिपल सीट’ आणि ‘हिरकणी’ सिनेमे प्रदर्शित होत आहेत.

मुंबई - यंदाच्या दिवाळीत रुपेरी पडद्यावर मराठीचा धूमधडाका पाहायला मिळणार आहे. बॉलिवूडच्या ‘हाउसफुल ४’, ‘मेड इन चायना’ आणि ‘सांड की आँख’ या चित्रपटांच्या बरोबरीने मराठी ‘ट्रिपल सीट’ आणि ‘हिरकणी’ सिनेमे प्रदर्शित होत आहेत. विशेष म्हणजे, तिन्ही हिंदी चित्रपटांवर मराठीची छाप आहे. ‘हाउसफुल ४’मध्ये मराठमोळा रितेश देशमुख आणि ‘सांड की आँख’मध्ये अभिनेत्री भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहेत; तर ‘मेड इन चायना’चा दिग्दर्शक मिखिल मुसळे मराठी आहे.

हिंदीमध्ये ‘हाउसफुल’ सिरीज चांगलीच लोकप्रिय ठरली. निर्माते साजिद नाडियादवाला आता त्याचा पुढचा मल्टिस्टारर भाग घेऊन येत आहेत. तब्बल २५ वर्षे गुजरातमध्ये राहणाऱ्या मिखिलचा पहिलावहिला हिंदी प्रोजेक्‍ट ‘मेड इन चायना’ येत आहे. यापूर्वी मिखिलने काही गुजराती चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्याच्या गुजराती चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ‘सांड की आँख’ चित्रपट भूमी पेडणेकरसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामध्ये तिने शार्प शूटरची भूमिका साकारली आहे. भूमी आणि रितेश दोघेही मराठी आहेत. मिखिलही मराठी आहे.

 यंदाच्या दिवाळीत अशा प्रकारे मराठी कलाकार आणि दिग्दर्शक एकत्र येण्याचा पहिलाच योग आहे. त्याचबरोबर मराठीमध्ये दोन महत्त्वपूर्ण चित्रपट प्रदर्शित होत आहेत.‘हिरकणी’मध्ये सोनाली कुलकर्णी प्रमुख भूमिकेत आहे. एका मातेची शौर्याची आणि ध्येयाची कथा त्यात साकारण्यात आली आहे. ‘ट्रिपल सीट’चा हिरो अंकुश चौधरी आहे. दोन्ही कलाकारांचा २०१९ मधील पहिलाच मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. दिग्दर्शक मिखिल मुसळे म्हणाला, की हिंदी सिनेमांत मराठी कलाकार असणे कौतुकास्पद बाब आहे.

टीमचा अभिमान
निर्माता व दिग्दर्शक राजेश म्हापुसकर म्हणाला की, दिवाळीत प्रदर्शित होणाऱ्या सगळ्या चित्रपटांमध्ये कलाकार आणि तंत्रज्ञ अशी बरीचशी मराठी मंडळी आहेत, ही चांगली अभिमानास्पद गोष्ट आहे. यंदा रुपेरी पडद्यावर खऱ्याअर्थी मराठमोळी दिवाळी असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Actor and Actress entertainment