म्हाडाच्या योजनेतून मराठी कलाकारांना ‘घर मिळणार घर’..!

सकाळ न्यूज नेटवर्क 
शुक्रवार, 12 जुलै 2019

- मराठी कलाकारांची आता घराची चिंता मिटणार.

- म्हाडाकडून मिळणार घर.

मुंबई : ‘कोणी घर देतं का घर’ हा नटसम्राट मधला संवाद मराठी कलाकारांच्या आयुष्यातला परवलीचा शब्द बनला होता. पण आता मराठी कलाकारांना हक्काचं घर देण्याचा महत्वकांक्षी निर्णय म्हाडा प्रशासनाने घेतला आहे.      

शिवसेना पक्षप्रमुख उद्घव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार सिनेमा आणि टीव्ही मालिका क्षेत्रात काम करणारे कलाकार आणि तंत्रज्ञ यांना आता म्हाडामार्फत स्वस्तात घरं उपलब्धं होणार आहेत. त्यासाठी आज शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्या सोबत बैठक घेतली. या बैठकीत कलाकार आणि तंत्रज्ञही उपस्थित होते.

बैठकीत महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत राहणाऱ्या कलाकारांना त्यांच्या जिल्हा विभागातच म्हाडाची घरं उपलब्ध करण्यात येतील. तर मुंबई एमएमआर रिजनमध्ये काम करणाऱ्या कलाकार आणि तत्रज्ञांना विरारमध्ये म्हाडाची घरं उपलब्धं करण्यात येतील, असे म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी सांगितले. या योजनेमुळे बॅकस्टेज कलाकार आणि तंत्रज्ञांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी सांगितले.

बैठकीला सरचिटणीस संग्राम शिर्के, सुशांत शेलार,दिगंबर नाईक, नितीन घाग, विद्या खटावकर, राणी गुणाजी, कलाकार आणि म्हाडाचे अधिकारी हजर होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Artist will get Home From MHADA Scheme