भेगाळल्या काँग्रेसवर नांदेड विजयाचे तुषार!

मृणालिनी नानिवडेकर
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

आदर्श प्रकरणात अडकलेले चव्हाण सध्या काँग्रेसमध्ये धनशक्‍ती राखणारे कदाचित एकमेव नेते आहेत. ते कार्यकर्त्यांना योग्य वेळी हवी ती रसद पोहोचवतात हे काँग्रेसचे आजी माजी आमदार सांगतात. त्यामुळेच नांदेडात भाजपच्या मतांची टक्‍केवारी लक्षणीयरित्या वाढली असली तरी काँग्रेसला थेट 71 जागा मिळवून देणारा विजय महत्वाचा आहे. तो भाजपच्या परतीच्या प्रवासाची सुरूवात नसेलही पण विजयासाठी आसुसलेल्या काँग्रेसच्या भेगाळ जमिनीप्रमाणे तृषार्त झालेल्या मानसिकतेवर शिडकावा टाकणारा आहे.

भारतीय जनता पक्ष गेली तीन वर्षे सतत जिंकतो आहे. ठाणे महानगरपालिकेचा अपवाद वगळता महाराष्ट्राच्या नागरी भागातील बहुतांश निवडणुका भाजपने जिंकल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्‍वासातले नेते, त्यांच्या आशिर्वादामुळे ते मुख्यमंत्री झाले असे बहुतांश भाजपनेते मानतात पण आपल्यावरील विश्‍वास सार्थ असल्याचे त्यांनी प्रत्येक विजयाने सिध्द करुन दाखवले. भाजपचे कार्यकर्ते आणि भाजपकडे कधीही समतोल दृष्टीने पाहू न शकणारे माध्यमकर्मीही या विजययात्रेला चटावले होते. प्रत्येक शिकार ही एखादया मृगेंद्रानेच करावी त्याप्रमाणे भाजप पालिका, महापालिका ताब्यात घेणारच असे समीकरण निश्‍चित झाले होते. नांदेडने त्याला तडा दिला. 

परभणी, नांदेड, उस्मानाबाद हे भाजपसाठी दुष्काळी जिल्हे. भाजपचे कमळ नांददेडात कधीही फुलले नाही. याही निवडणुकीत ते फुलणार नव्हतेच, पण रोजचीच शिकार भाजपच्या नावावर जमा होत असल्याने तेथील पराभव चर्चेचा विषय आहे. खरे तर भाजपची नांदेडमधील मतांची टक्‍केवारी तीन वरून तब्बल 24 वर पोहोचली. 26 वॉर्डात शिवसेनेने घेतलेल्या मतांमुळे भाजप उमेदवार पडले. किमान आठ ठिकाणी शंभरच्या आत असलेल्या मतांनी पराभुत झाले. सहा ठिकाणी जिंकले. तरीही नांदेडचे निकाल भाजपचा पराभव आहेत अन् काँग्रेसचा विजय. त्याची कारणे नेमकी काय आहेत ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. ते आजवर अशा प्रकारे प्रत्येक महापालिकेत स्थानिकांना पुढे करून निवडणूक जिंकण्यात यशस्वी झाले होते, तसे यावेळी घडले नाही. कारण तेथे काँग्रेसकडे नेता होता.

थकलेल्या संघटनेत जीव ओतला जातो तो भारतासारख्या देशात एखादया व्यक्‍तीमुळे. काँग्रेसकडे असे नेतृत्व राहिलेले नाही. राहुल गांधी आजही चाचपडत आहेत. भारतीय स्वातंत्र्यसंग्राम परदेशस्थ भारतीयांनी चालवला, असे म्हणून ते मोकळे होतात तर कधी देशाची संस्कृती न समजल्याने अर्धी चडडी घालून महिलांना संघस्थानावर का येवू दिले जात नाही, असा बाष्कळ प्रश्‍न करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत साहसाने दिलेली आश्‍वासने त्यांना पूर्ण करता येत नसल्याने आज जनता काही अंशी बिथरली आहे. मोदी यांचे भारत बदलण्याचे प्रयत्न प्रामाणिक होते, आहेत. पण ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी वेळ लागेल, या देशाचा नोकरशाही ढाचा कोणतेही बदल लवकर अंगीकारत नाही हे लक्षात न घेतल्याने मोदी अपयशी ठरले आहेत. त्यातच भाजपला शब्दश: अच्छे दिन दाखवणाऱ्या अमित शहांनाही लोकांची मते ऐकून घ्यायला आवडत नाही, असा सार्वत्रिक समज आहे. जनता वैतागली आहे, दररोजच्या भाषणांना कंटाळली आहे. पर्याय नसल्याने आपल्याला भाजपलाच मते दयावी लागतील, असे वाटत असल्याने मनोमन अधिकच भडकली आहे. नांदेडात काँग्रेसला अशा परिस्थितीत विजय मिळाल्याने तो महत्वाचा आहे, नवसंजीवनी देणारा आहे.  

कार्यकर्त्यांची मानसिक गरज विजयाची असते. तो नांदेडात, कार्नटकात झाला तरी पुरतो. वैतागलेल्या जनतेची मानसिकता काँग्रेस कार्यकर्त्यांना अचूक लक्षात येत असल्याने तर अशोकरावांच्या या संभाव्य यशाला झालर लाभली आहे ती सत्तेत आपण परतून येवू शकतो या आशेची. ही आशा अंधूक आहे याची जाणिव काँग्रेसजनांना असणारही कारण अशोकरावांनीच भाजपचे आव्हान मोठे आहे हे मान्य केले आहे, पण तरीही विजय हा विजय आहे. काँगेसजनांनी आपापल्या जिल्ह्यांवर अशीच पकड दाखवली, तेथे काम उभे केले तर पक्ष पुन्हा जोमाने उभा राहू शकतो, असा विश्‍वास या छोट्या विजयाने दिला आहे. काँगेसला समाधान देणारी बाब म्हणजे अल्पसंख्यांक मते पुन्हा एकदा या पक्षाकडे परतली आहेत. जिंकणाऱ्या घोडयावर पैसे लावणे या समुदायाला आवडते. तसाही भारतातील मुस्लिम समुदायाचा मुख्य स्वर काँग्रेस आहे. अयोध्येपासून नाराज असलेला हा समाज काँग्रेसकडे वळणे आता अपरिहार्य मानेल. महंत आदित्यनाथ यांना उत्तरप्रदेशाची गादी सोपवली गेल्यामुळे भाजप हिंदु राजकारण करू पहाते, असा संदेश पोहोचला आहेच. त्यामुळेच अस्वस्थ झालेले मुस्लिम मानस जर काँग्रेसकडे परतत असेल तर पक्षाला मोठा लाभ आहे. 

आदर्श प्रकरणात अडकलेले चव्हाण सध्या काँग्रेसमध्ये धनशक्‍ती राखणारे कदाचित एकमेव नेते आहेत. ते कार्यकर्त्यांना योग्य वेळी हवी ती रसद पोहोचवतात हे काँग्रेसचे आजी माजी आमदार सांगतात. त्यामुळेच नांदेडात भाजपच्या मतांची टक्‍केवारी लक्षणीयरित्या वाढली असली तरी काँग्रेसला थेट 71 जागा मिळवून देणारा विजय महत्वाचा आहे. तो भाजपच्या परतीच्या प्रवासाची सुरूवात नसेलही पण विजयासाठी आसुसलेल्या काँग्रेसच्या भेगाळ जमिनीप्रमाणे तृषार्त झालेल्या मानसिकतेवर शिडकावा टाकणारा आहे. मृतप्राय कार्यकर्त्यांना मिळालेल्या नांदेडच्या विजयाची संजीवनी पक्षाला कुठवर बळ देते ते आता पाहायचे.

(मृणालिनी नानिवडेकर 'सकाळ'च्या मुंबईतील ज्येष्ठ राजकीय पत्रकार आहेत.)

Web Title: Marathi blog Nanded Election Ashok Chavan Mrunalini Naniwadekar