मराठी चित्रपटांना चलनटंचाईचे चटके

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

मुंबई - चलन चणचणीचा तडाखा मराठी चित्रपटसृष्टीलाही बसला आहे. त्यामुळे लागोपाठचे तिन्ही शुक्रवार मराठी चित्रपटांसाठी "ब्लॅक फ्रायडे' ठरले.

मुंबई - चलन चणचणीचा तडाखा मराठी चित्रपटसृष्टीलाही बसला आहे. त्यामुळे लागोपाठचे तिन्ही शुक्रवार मराठी चित्रपटांसाठी "ब्लॅक फ्रायडे' ठरले.

तीन आठवड्यांपासून एकही मराठी चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. चित्रपट प्रदर्शित केला तर सिनेमागृहात प्रेक्षक येणार नाहीत, या भीतीमुळे अनेक चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलले आहे. विविध चित्रपट महोत्सव तसेच पुरस्कार सोहळ्यांमध्ये पाठवण्यासाठी डिसेंबरमध्येच मराठीमध्ये सहा ते सात चित्रपट प्रदर्शित होतात. काही निर्माते आणि दिग्दर्शक टेक्‍निकली अर्थात एखाद-दुसऱ्या चित्रपटगृहात आपला चित्रपट प्रदर्शित करतात आणि पुरस्कार वा अनुदानासाठी पाठवतात. या डिसेंबरमध्ये मात्र "तू कोल्ड मी बोल्ड', "कौल' आणि "गुलमोहर' हे चित्रपट प्रदर्शित झाले. तेही पहिल्या आठवड्यात. त्यानंतर सलग तीन आठवडे एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही.

चलनटंचाईमुळे मराठी इंडस्ट्रीत तंगी आहे; तरीही या महिन्यात "फुगे', "आक्रंदन', "भय' प्रदर्शित होणार होते; परंतु पुरेसे पैसे मिळत नसल्याने प्रेक्षक येणार नाहीत, या भीतीपोटी त्यांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. काही चित्रपटांचे चित्रीकरणही ठप्प झाले आहे. याबाबत वितरक समीर दीक्षित म्हणाले, की मराठीतील ही स्थिती निराशाजनक आहे. परिस्थिती सुधारण्यास आणखी काही महिने लागतील.

दादांना दाद
नोटा बाद केल्यानंतर लालबागच्या भारतमाता चित्रपटगृहात दादा कोंडके यांचे चित्रपट लावण्यात आले. त्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. हिंदीत आमीर खान यांचा "दंगल' प्रदर्शित झाला आणि त्याने चांगला गल्ला जमवला; पण मराठी निर्मात्यांनी मात्र भीतीने चित्रपटच प्रदर्शित केले नाहीत.

Web Title: Marathi films currency shortage