मराठी साहित्य होणार ग्लोबल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

मुंबई - "अमृताते पैजा जिंकी', असा गोडवा मराठी भाषेचा गायला जातो. त्याचप्रमाणे मराठी साहित्यातही उत्तम साहित्यनिर्मिती केली जाते; मात्र अनेकदा भाषिक अडचणीमुळे हे दर्जेदार साहित्य इतर भाषिकांपर्यंत पोचत नाही. त्यासाठीच साहित्य आणि संस्कृती मंडळाने पुढाकार घेतला असून, मराठीतील दर्जेदार साहित्य इंग्रजीत अनुवादित केले जाणार आहे. 

मराठी भाषेतील साहित्य कितीही उत्तम, दर्जेदार असले तरीही इतर भाषिकांपर्यंत पोचण्यासाठी, जगाच्या कानाकोपऱ्यातील साहित्य रसिकांपर्यंत पोचण्यासाठी त्याला इतर भाषेचा पूल म्हणून वापर करावा लागणार; मात्र मराठी साहित्यामध्ये अनुवादाची प्रक्रिया मर्यादित स्वरूपाची आहे. तिला बळकटी देण्याचा प्रयत्न साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त मराठी पुस्तकांचा अनुवाद साहित्य अकादमी करतेच; मात्र इतर पुस्तकांचे अनुवाद करण्याचे प्रमाण कमी आहे. इंग्रजी ही ग्लोबल भाषा मानली जाते. त्यामुळेच मराठीतील पुस्तकांचा इंग्रजी अनुवाद करण्यात येणार आहे. त्यामध्ये कादंबरी, कथासंग्रह, समीक्षा, कवितासंग्रह अशा साहित्याच्या विविध प्रकारांतील प्रत्येकी एक अशा प्रतिवर्षी दहा पुस्तकांची निर्मिती करण्यात येणार आहे. वाङ्‌मय समितीच्या माध्यमातून या दहा पुस्तकांची निवड करण्यात येणार आहे. येत्या 27 फेब्रुवारीला मराठी भाषादिनी या पुस्तकांच्या नावांची घोषणा साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे. नुकतीच केंद्र सरकारने भाषिक धोरणासाठी दिलेल्या अनुदान प्रकल्पातून उडिया भाषेतही पुस्तके अनुवाद करण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. भाषेचे आदान प्रदान झाल्यास मराठीची समृद्धी अधिक वाढेल, अशी अपेक्षा भाषातज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

Web Title: Marathi literature