एकलव्यच्या संध्या जाधव, धनंजय हिले, सचिन भोजनेची स्पर्धा परिक्षेला गवसणी

residenational photo
residenational photo


नाशिक ः येथील पेठ रोडवरील आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य मॉडेल रेसीडेन्सी स्कूलमधील 2006 च्या पहिल्या दहावीच्या तुकडीची संध्या रोहिदास जाधव, 2010 च्या तुकडीचे धनंजय काशिनाथ हिले, 2012 च्या तुकडीचे सचिन देवजी भोजने या आदिवासी तरुणांनी स्पर्धा परीक्षेतील यशाला गवसणी घातली. विशेष म्हणजे, या तिघांनी पुण्यातून अभियांत्रिकीची मॅकेनिकलची पदवी संपादन केली आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) आगाराच्या व्यवस्थापक म्हणून संध्या कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकपदाच्या मुख्य परीक्षेत तिघांनी हे यश मिळवले आहे. धनंजय हिलेने खुल्या प्रवर्गातून राज्यस्तरावर 23 वा, सचिन भोजनेने आदिवासी प्रवर्गातून राज्यात प्रथम अन्‌ संध्याने आदिवासी मुलींमधून राज्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे.

संध्या या मूळच्या शहाणा (ता. शहादा, जि. नंदूरबार) येथील रहिवाशी आहेत. नंदूरबारमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून सेवेत असलेल्या रोहिदास जाधव यांना चार कन्या आणि एक मुलगा आहे. त्यांची थोरली कन्या प्राथमिक शिक्षिका, धाकटी कन्या कराड तंत्रनिकेतनमध्ये प्राध्यापक आहे, तर धाकटा मुलगा पुण्यात स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. संध्या या तिसऱ्या क्रमांकाच्या कन्या आहेत. संध्या यांना एकलव्य शाळेतील प्रवेशाची परीक्षा देता आली नव्हती. वडील त्यांना घेऊन आदिवासी विकास आयुक्तालयात आले होते. आयुक्तालयातून त्यांना शाळेत पाठवण्यात आले. तेंव्हा एक मुलगी शाळेत दाखल न झाल्याने संध्याला प्रवेश मिळाला.

संध्या यांनी पुण्यातील कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरींग फॉर वूमन्समधून 2015 मध्ये पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. त्यावेळी राज्य परिवहन महामंडळाच्या वर्ग दोनच्या अधिकारीपदाची परीक्षा दिली अन्‌ त्यांची आगार व्यवस्थापक म्हणून मे 2016 मध्ये प्रशिक्षणासाठी निवड झाली. जून 2017 मध्ये त्या पिंपळगावला आगार व्यवस्थापक म्हणून हजर झाल्यात. आगार व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळत त्यांनी वेळ मिळेल तसा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरु ठेवला. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवण्याचे ध्येय त्यांनी ठेवले आहे. 

 धनंजय अन्‌ सचिन नगर;चे यशही कौतुकास्पद
धनंजय अन्‌ सचिन हे दोन्ही तरुण नगर जिल्ह्यातील आहेत. धनंजयचे मूळ गाव राजूर (ता. अकोले) हे असून त्याचे वडील ग्रामसेवक आहेत. सचिनचे मूळ गाव शिरसगाव (ता. संगमनेर) हे आहे. त्याचे वडील प्राथमिक शिक्षक आहे. या दोघांनी पुण्यातील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतली. दोघांनी एकलव्य शाळेतील प्रवेशाची परीक्षा उत्तीर्ण होत प्रवेश मिळवला होता. पुण्यातील अभ्यासिकेच्या माध्यमातून धनंजयने स्पर्धा परीक्षेची तयारी केली. त्याने आता केंद्रीय कनिष्ठ अभियंता पदाची पूर्वपरीक्षा दिली असून त्याची मुख्य परीक्षेची तयारी सुरु आहे. सचिनने अभियांत्रिकीच्या अखेरच्या वर्षात शिकत असताना वेळ काढत स्पर्धा परीक्षा दिली. केंद्रीय तांत्रिक सेवा स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून करिअर करायचे उद्दिष्ट त्याने निश्‍चित केले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com