पुरणपोळीची चव न्यारी, "गोदावरी' पोचली दुबईतीरी

विवेक मेतकर
रविवार, 18 मार्च 2018

मराठी संस्कृतीत पाडव्याचे मिष्टान्न पुरणपोळीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. अशी ही पुरणपोळी एका बचत गटाच्या माध्यमातून दुबईपर्यंत जाऊन पोचली आहे. दहा वर्षांपूर्वी छोट्याशा खोलीत सुरू केलेला व्यवसाय दर महिन्याला एक लाख रुपये मिळवून देत आहे. 

अकोला : मराठी संस्कृतीत पाडव्याचे मिष्टान्न पुरणपोळीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. अशी ही पुरणपोळी एका बचत गटाच्या माध्यमातून दुबईपर्यंत जाऊन पोचली आहे. दहा वर्षांपूर्वी छोट्याशा खोलीत सुरू केलेला व्यवसाय दर महिन्याला एक लाख रुपये मिळवून देत आहे. 

तेल्हारा तालुक्‍यातील कल्पना दिवे यांनी 2008 मध्ये बचत गटाच्या व्यवसायाला सुरवात झाली. या बचत गटाच्या संचालिका कल्पना दिवे या उच्चशिक्षित व अनुभवी, अभ्यासू असल्याने त्यांनी प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करायला सुरवात केली. याकामी त्यांनी सासुबाई गोदावरी दिवे आणि पती किशोर दिवे यांचे मार्गदर्शनही घेतले. आपल्या बचत गटाला शेतीपूरक व्यवसायाची जोड लाभावी, म्हणून सर्वप्रथम दुग्धव्यवसाय सुरू केला. नंतर बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय करण्याकरिता बैठकी घेतल्या. त्यामध्ये आवळा खव्याची पुरणपोळी व लोणचे बनण्यावर सर्वांनी भर दिला. बाहेरून आवळा, आंबा, लिंबू आदी फळे विकत आणण्यापेक्षा त्यांनी घरच्या शेतातच या फळांचे उत्पादन घेतले. 

त्यामधील फळांवर आवश्‍यक ती प्रक्रिया करून उत्तम दर्जाचे चवदार असे आंबा, आवळा, कवठ, लिंबू, मिरची, कारले, हळद आदींचे लोणचे व सोबतच आवळा खवा पुरणपोळी, लसून पापड, मिरची पापड, पालक पापड व बेल मुरब्बा, आवळा कॅंडी, सरबत हे सर्व पदार्थ कृतीतून उतरविले. त्याला व्यवस्थित पॅकिंग करून ते लोकांपर्यंत पोचविले. जस-जसे हे लोणचे, पुरणपोळी लोकांपर्यंत जायला लागली. तससशी त्याची मागणी वाढायला लागली. 

वाढती मागणी 

आज मुंबई, पुणे, कोलकातासह दुबईपर्यंत त्यांची उत्पादने पोचली आहेत. हजारो ग्राहक या पुरणपोळीचा आस्वाद घेत असून, मागणीत सातत्याने वाढ होत असल्याचे कल्पना दिवे यांनी सांगितले. महिलांच्या बचत गटाच्या या लघुउद्योगाची भरारी वाखाणण्याजोगी आहे. 

Web Title: Marathi News Akola News Business Puran Poli