मराठवाड्यासह विदर्भातील चार हजार गावांत "कृषी संजीवनी' 

राजेभाऊ मोगल
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

औरंगाबाद जिल्ह्यातील 163, जालना 106, बीड 165, लातूर 116, उस्मानाबाद 54, नांदेड 190, परभणी 180 आणि हिंगोली जिल्ह्यातील 112 गावे समृद्ध होतील. या कामाला गती देण्यासाठी येत्या काही दिवसांतच संबंधित गावात जलसंधारणाच्या कामास सुरुवात होणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले दिवस आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. 

औरंगाबाद - मागील काही वर्षांपासून पर्यावरणाचे संतुलन बिघडत असल्यामुळे अपुरा पाऊस, पावसाचे दिवस कमी होणे, मान्सूनचे उशिरा होणारे आगमन अशा विविध समस्यांशी शेतकऱ्यांना दोनहात करावे लागत आहेत. याचा थेट परिणाम उत्पादनावर होत असल्याने शेतकरी स्वत:ला संपविण्यासारखे पाऊल उचलत आहे. हे प्रकार थांबविण्यासाठी जागतिक बॅंकेच्या सहकार्याने विदर्भ आणि मरावाड्यातील सुमारे चार हजार गावांमध्ये हवामान अनुकूल कृषी प्रकल्प अर्थात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना राबविण्यात येणार आहे.

या प्रकल्पांतर्गत चालू आर्थिक वर्षासाठी मराठवाड्यातील 1 हजार 24 गावांची निवड करण्यात आली आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपासून विविध संकटांचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावांची या प्रकल्पात निवड करण्यात आली आहे.

निवड झालेल्या गावात जलसंधारण, गटशेती, सेंद्रिय शेती, ठिबक सिंचन उदरनिर्वाह उपक्रम अशा प्रकारच्या अनेक कृषी योजना राबविण्यात येणार असल्याचे कृषी अधिकारी पी. एम. शिंदे यांनी सांगितले. या प्रकल्पाचा आराखडा जवळपास 4 हजार कोटी असून, 70 टक्के निधी जागतिक बॅंकेच्या अर्थसाहाय्यातून, तर उर्वरित 30 टक्के निधी राज्य शासनाकडून उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

औरंगाबाद जिल्ह्यातील 163, जालना 106, बीड 165, लातूर 116, उस्मानाबाद 54, नांदेड 190, परभणी 180 आणि हिंगोली जिल्ह्यातील 112 गावे समृद्ध होतील. या कामाला गती देण्यासाठी येत्या काही दिवसांतच संबंधित गावात जलसंधारणाच्या कामास सुरुवात होणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले दिवस आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. 
 
Web Title: marathi news aurangabad news Krishi Sanjivani in four thousand villages of Vidarbha along with Marathwada