राज्यसभेत समाधानी नसल्याने आठवले लढणार लोकसभा 

राजेभाऊ मोगल
मंगळवार, 8 मे 2018

...तो कैसे बनेंगे पंतप्रधान राहूल गांधी 
राहुल गांधी यांनी आपण पंतप्रधान होणार असल्याचे जाहीर केल्याचे श्री. आठवले यांच्या निदर्शनास आणून दिले असता, त्यांनी आपल्या खास शैलीत शीघ्रकाव्य म्हटले. "दस - पंधरा साल रहेगी नरेंद्र मोदी की आँधी, तो फिर कैसे पंतप्रधान बनेंगे राहुल गांधी,' ही रचनाच सादर केली. तसेच गांधी यांना पंतप्रधान होण्यास अजून वेळ असल्याचेही त्यांनी सांगून टाकले.

औरंगाबाद - सध्या मी काही राज्यसभेत समाधानी नाही. त्यामुळे मला आगामी लोकसभा लढवायची आहे. त्यासाठी मला सेफ असलेला दक्षिण मुंबई किंवा विदर्भातील रामटेक मतदारसंघ हवा आहे. त्याविषयी माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलणेही झालेले असल्याचे स्पष्ट करीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मनातील इच्छा येथे व्यक्‍त केली. 

मिलिंद महाविद्यालयात उज्ज्वला योजनेअंतर्गत अनुसूचित जाती समुदायास गॅस एजन्सीचे वितरण करण्यासाठी श्री. आठवले मंगळवारी (ता. आठ) शहरात आले होते. या कार्यक्रमापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ""मी चळवळीतील कार्यकर्ता असल्याने विविध प्रश्‍नांवर मी बोलत असतो. मात्र, राज्यसभेत समाधानी नसल्यानेच आगामी लोकसभा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 1998च्या लोकसभा निवडणुकीत आपण विजयी झालेल्या दक्षिण मुंबई मतदारसंघातून लढण्याचा विचार आहे.

सध्या या ठिकाणी शिवसेनेचे राहुल शेवाळे निवडून आलेले आहेत. शिवसेना - भाजप युती झाली, तर आपण या मतदारसंघाची मागणी करू. अन्यथा विदर्भातील रामटेक हा मतदारसंघदेखील माझ्यासाठी सेफ आहे. सध्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नाराज असल्याची बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितली असून, लवकरच त्या दोघांची भेट होणार आहे. यातून त्यांची नाराजी दूर होईल.'' 

...तो कैसे बनेंगे पंतप्रधान राहूल गांधी 
राहुल गांधी यांनी आपण पंतप्रधान होणार असल्याचे जाहीर केल्याचे श्री. आठवले यांच्या निदर्शनास आणून दिले असता, त्यांनी आपल्या खास शैलीत शीघ्रकाव्य म्हटले. "दस - पंधरा साल रहेगी नरेंद्र मोदी की आँधी, तो फिर कैसे पंतप्रधान बनेंगे राहुल गांधी,' ही रचनाच सादर केली. तसेच गांधी यांना पंतप्रधान होण्यास अजून वेळ असल्याचेही त्यांनी सांगून टाकले. 

दररोज गट काढणाऱ्यांकडूनच ऐक्‍याची भाषा 
दलित ऐक्‍याबाबत श्री. आठवले यांना विचारणा केली असता ते म्हणाले, की जे दररोज गट काढतात, तेच ऐक्‍याची भाषा करीत आहेत. ऐक्‍यात सामील होण्याची आपली तयारी आहे. खरे तर ऐक्‍याशिवाय आम्ही कुणालाच फिरू देणार नाही, असे आता दलित बांधवांनीच ठणकावून सांगायला हवे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. केवळ एका जातीचे संघटन करून काहीही उपयोग होणार नाही. त्यापेक्षा बहुजन समाजाचे संघटन निर्माण केल्यास देशात आपणच एक पक्ष राहू, असा दावाही त्यांनी केला. 

... तर भिडेंना अटक होईल 
या देशात कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही. त्यामुळे जर कोरेगाव-भीमा प्रकरणात संभाजी भिडे यांचा संबंध असेल तर अटक व्हायलाच हवी, अशी भूमिका स्पष्ट करीत श्री. आठवले यांनी भिडेंची न्यायालयीन चौकशी तातडीने करण्याची मागणी येथे केली. जर त्यात ते दोषी सापडले तर त्यांना अटक होईलच, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

सामाजिक सलोखा हवा 
सध्या सर्वत्र जाती-धर्मांत वाद होण्याचे प्रमाण वाढत आहे. हे रोखण्याचे काम सरकारबरोबरच समाजाचेदेखील आहे. त्यामुळे वादाच्या काही घटना सोशल, तर काही पॉलिटिकल असल्याचेही श्री. आठवले यांनी स्पष्ट केले.

हिंदुराष्ट्र कसे शक्‍य आहे? 
अजूनमधून आरएसएसकडून हिंदुराष्ट्राच्या घोषणा येतात. याकडे आपण कसे पाहता, असे विचारले असता, श्री. आठवले म्हणाले, ""अहो, इथले मुस्लिम, बौद्धांसह अन्य मोठ्या प्रमाणात असलेला समाज कसा काय हिंदू होईल? त्यामुळे हिंदुराष्ट्र वगैरे शक्‍य नसल्याचे त्यांनी बोलून दाखविले.

Web Title: marathi news aurangabad news Not satisfied in rajyasabha, athavale to contest loksabha