सरकारच्या फसव्या धोरणांमुळे शेतकरी अस्वस्थ : शरद पवार

राजेभाऊ मोगल
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

पेरणींसाठी मागणी करूनही शेतकऱ्यांना कर्ज दिले नाही, मोठ्या कष्टाने पिकविलेल्या शेतमालास योग्य भाव दिला जात नसून, फसव्या धोरणांमुळे शेतकरी अस्वस्थ आहे.

- शरद पवार

औरंगाबाद : कर्जमाफीची घोषणा करून आठ महिने झाले तरी अद्यापही शेतकरी कर्जमुक्‍त झाला नाही. चांगला पाऊस पडला. मात्र, पेरणींसाठी मागणी करूनही शेतकऱ्यांना कर्ज दिले नाही, मोठ्या कष्टाने पिकविलेल्या शेतमालास योग्य भाव दिला जात नसून, फसव्या धोरणांमुळे शेतकरी अस्वस्थ आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली. यावेळी त्यांनी सरकारच्या धोरणांवर चहुबाजूंनी हल्लाबोल केला. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथून सुरवात झालेल्या दुसऱ्या टप्यातील हल्लाबोल यात्रेचा शनिवारी (ता.3) पवार यांच्या सभेनी औरंगाबादेतील दिल्लीगेट समोर समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, पाऊस चांगला झाल्याने यंदा कपासीचे पिक चांगले आले. मात्र, बोंडअळीच्या लागणीमुळे ते पूर्णत: उद्धवस्त झाले. आता शेतकऱ्यांना मदतीची मागणी होत असताना कंपन्यांवर जबाबदारी लादत आहेत. हे हास्यास्पद आहे. आज कुठल्याच शेतमालास भाव नाही. विशेष म्हणजे 25 पिकांची पाहणी करणे आणि ते खरेदी करून साठवणूक करण्याची सरकारकडे कुठलीही व्यवस्थाच नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शेतकमाला भाव, तरुणांच्या हाताला रोजगार देण्याऐवजी सरकारने धार्मिक दंगली दिल्या असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच शेतकरी आत्महत्येसही सरकारच जबाबदार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. आजचा तरुण आता परिर्वनाच्या तयारीत असून, त्याची सुरवात मराठवाड्यातून होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

पवार यांचे भाषण सुरु असतानाच गंगापूर-खुलताबाद विधानसभा भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मध्यस्थी करीत गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेतले. या प्रकाराचा नेते अजित पवार, धनंजय मुंडे यांनी समाचार घेतला. तुमचेच सरकार असताना त्यांच्याकडे दाद मागा ना, इथे कशाला गोंधळ घालता, असा टोला लगावला आहे.

Web Title: Marathi News Aurangabad News Politics Sharad Pawar farmers tension