भाजपचा 'हमीभाव' आमदार फोडायला, शेतकऱ्यांना नाही- सेना

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : राज्यात सध्या सत्तेवर असलेल्यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना आकाशातून चंद्र-सूर्य आणून देऊ अशा घोषणा केल्या होत्या, पण आज शेतकरी हमीभावासाठी रोज मरण पत्करत आहे. शेतकऱ्यांना हमीभाव द्यायला पैसे नाहीत, पण आमदारांना विकत घेण्यासाठी भाजपच्या तिजोरीत व मंत्र्यांच्या खिशात कोट्यवधी रुपये आहेत. शेवगावच्या रस्त्यावर झालेले उस उत्पादकांचे आंदोलन हा त्याचाच उद्रेक आहे, अशी जोरदार टीका शिवसेनेने भाजप सरकारवर केली आहे. 

शेतकऱ्यांवर गोळीबार व लाठीहल्ला करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांचे ऊसदर आंदोलन पेटले असून, या घटनेचा सर्व स्तरांतून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही या प्रकाराचा निषेध केला आहे. राज्यात सत्ताधारी घटक पक्ष असलेल्या शिवसेनेनेही या मुद्द्यावरून फडणवीस सरकारवर 'सामना'मधून टीका केली आहे. 

नगरचे शेतकरी हिंसक झाले हे समजण्यासारखे आहे, पण ते हिंसक का झाले? शेतकऱ्यांचा गुन्हा काय? नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे बुधवारी हा प्रकार घडला. शेतकऱ्यांची मागणी काय आहे? उसाला प्रतिटन ३१०० रुपये भाव मिळावा व प्रश्न सामोपचाराने मिटावा. ही मागणी असेल तर त्यात काय चुकले? या प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यायला हवीत, असे शिवसेनेने म्हटले आहे. 

शेतकरी संपही असाच दडपला...
महाराष्ट्रातील शेतकरी संपूर्ण कर्जमाफीसाठी संपावर गेला तेव्हाही त्याच्या छाताडावर बंदुका रोखून धमकावण्याचा प्रयत्न झाला. हा संप फोडताना जी आश्वासने सरकारने दिली ती पूर्ण झाली नाहीत. म्हणून काल शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरला. मात्र त्या शेतकऱ्यांवरदेखील पोलिसांनी अमानुष गोळीबार केला आहे. सरकारचे हे कृत्य अमानुष आहे. निर्लज्जपणाचे आहे. 
हमीभावाच्या मागणीसाठी शेवगाव-पैठण रस्त्यावरील वाहतूक शेतकऱ्यांनी रोखून धरली. रात्रभर आंदोलन केल्यानंतरही सरकारतर्फे कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू झाले. त्यात पोलिसांनी अटकसत्र सुरू केल्याने आंदोलक संतप्त झाले. खानापूर येथे लोकांनी रस्त्यावर लाकडे, दगड, टायर फेकले. उसाने भरलेल्या ट्रक्टर्सच्या टायरमधील हवा सोडली. स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. पोलिसांना गोळीबार करावा लागला असे सांगण्यात येत आहे. 

शेतकऱ्यांच्या रक्ताने भिजली भूमी...
भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी संतप्त शेतकऱ्यांशी बोलण्याची हिंमत दाखवायला हवी होती. पोलिसांनीही टोकाची भूमिका न घेता, दडपशाही न करता संतप्त आंदोलकांना हाताळायला हवे होते. मात्र तसे न करता त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांवर थेट गोळ्या झाडल्या. या गोळ्या प्लॅस्टिकच्या आहेत असे आता सांगितले गेले, पण या गोळ्यांनीही अनेक शेतकरी जखमी झाले. त्यापैकी दोन शेतकरी गंभीर जखमी झाले. त्यामुळे आंदोलन आणखी चिघळले. शेवगावची भूमी शेतकऱ्यांच्या रक्ताने भिजली आहे. 

धनंजय मुंडे बरोबर बोलले...
विरोधी पक्षात असताना उसाला प्रतिटन ३४०० रुपये भाव द्यावा अशी मागणी भाजप सातत्याने करत होता. तोच भाजप आता प्रतिटन उसासाठी ३१०० रुपये मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार करतो ही शरमेची बाब असल्याचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे म्हणाले ते चुकीचे नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com