पहिल्याच दिवशी सरकार बॅकफूटवर 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

मुंबई - राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाची मराठी अनुवाद करण्याची प्रक्रिया चुकल्याने विधिमंडळात आज प्रचंड गदारोळ उडाला. या वेळी मराठी भाषेचा सरकारने खून केल्याचा आरोप विरोधकांनी केला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झालेल्या चुकीबाबत सभागृहात जाहीर माफी मागितली. त्यामुळे अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकार बॅकफूटवर गेले, तर विरोधकांनी संपूर्ण अधिवेशनात सरकारवर तुटून पडण्याचे सूतोवाच दिले. 

मुंबई - राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाची मराठी अनुवाद करण्याची प्रक्रिया चुकल्याने विधिमंडळात आज प्रचंड गदारोळ उडाला. या वेळी मराठी भाषेचा सरकारने खून केल्याचा आरोप विरोधकांनी केला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झालेल्या चुकीबाबत सभागृहात जाहीर माफी मागितली. त्यामुळे अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकार बॅकफूटवर गेले, तर विरोधकांनी संपूर्ण अधिवेशनात सरकारवर तुटून पडण्याचे सूतोवाच दिले. 

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाचा मराठीत अनुवाद न झाल्याबद्दल फडणवीस यांनी आज सभागृहात जाहीर माफी मागितली आणि याप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करू, असे आश्वासन दिले. संबंधित घटनेची योग्य चौकशी करून कारवाई करण्याचे आश्‍वासन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिले. 

संबंधित बाब ही गंभीर असून, आज त्यांच्या भाषणाचा मराठीत अनुवाद न होणे ही बाब गंभीर आहे. याविषयी खुद्द शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना अनुवाद करावा लागला, त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई करून त्यांना घरी पाठवले पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी अध्यक्षांकडे केली. यापुढे अशा घटना घडू नयेत म्हणून दक्षता घेण्यात येईल, असे सांगतानाच याप्रकरणी त्यांनी सभागृहाची माफी मागितली. 

याप्रकरणी योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची घोषणा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली. 

अभिभाषणावर बहिष्कार 
सी. विद्यासागर राव यांचे अभिभाषण मराठीत अनुवादित न करून दिल्याने सरकारने मराठी भाषेचा अवमान केला असल्याचे सांगत विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला. मराठी विरोधी सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकून सभात्याग केला. विधानभवनातील शिवरायांच्या प्रतिमेजवळ सरकारविरोधी घोषणा देऊन सरकारचा धिक्कार करीत विरोधकांनी आंदोलन केले. या वेळी विरोधकांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. राज्यपालांचे भाषण मराठीत अनुवादित न होता ते गुजरातीत होत असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला. 

कारवाई करा - राज्यपाल 
अभिभाषणावेळी मराठी अनुवाद वाचनाची व्यवस्था न झाल्याबद्दल राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी संताप व्यक्‍त केला आहे. या चुकीसाठी जबाबदार व्यक्‍तींविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी सूचना त्यांनी विधान मंडळाला पत्र लिहून केली आहे. 

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून पडतात. मात्र, या वेळी अभिभाषणाच्या सुरवातीलाच विरोधकांच्या हातात आयती संधी आल्याने अर्थसंकल्पी अधिवेशनाचा पहिला दिवस सत्ताधाऱ्यांसाठी जड गेला. सी. विद्यासागर राव यांनी इंग्रजीत भाषण सुरू केले. त्यांच्या भाषणाचा अनुवाद मराठीत करणे अपेक्षित होते; मात्र मराठीत अनुवाद वाचणारी व्यक्‍तीच उपस्थित नसल्याने संभ्रम निर्माण झाला. या सर्व प्रकाराची गंभीर दखल राज्यपालांसह विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी घेतली आहे. या प्रकरणास जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. हा चौकशी अहवाल उद्याच सभागृहांच्या दोन्ही पटलांवर ठेवला जाण्याची शक्‍यता आहे.

Web Title: marathi news Budget session state government