शेतकऱ्यांची कर्जमाफी अजूनही कागदावरच; शेतकरी संभ्रमात

farmer
farmer

नांदुरा (बुलडाणा) : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कर्जमाफी योजनेतंर्गत जिल्ह्यातील 2 लक्ष 22 हजार 309 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले, मात्र अद्याप लाभ मिळाला नसल्याने शेतकऱ्यांची कर्जमाफी अजूनही कागदावरच असल्याचा आरोप होत असून  पात्र-अपात्रबाबत शेतकरी संभ्रमात आहात. 

शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कृषी सन्मान योजना २०१७ अंतर्गत राज्यातील सुमारे ८९ लाख शेतकऱ्यांना अंदाजे रुपये ३४.०२२ कोटी रुपयांची कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांना खुशखबर दिली.मात्र सरसकट, तत्वतः व निकषांच्या आधारावर करण्यात आलेल्या या कर्जमाफीत आतापर्यंत खरोखरच किती शेतकरी आजरोजी पात्र ठरले हाच एक संशोधनाचा विषय आहे. सध्या तर बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र बहाल करून शासनाने शेतकऱ्यांची एकप्रकारे थट्टा करून कागदावरच्या कर्जमाफीचे ढोंग रचल्याचीच भावना शेतकरी वर्गातून उमटत आहे. राज्यात आजरोजी एकूण १३६ लाख शेतकऱ्यांची शासन दरबारी नोंद असून यातील अनेक शेतकरी पिककर्जासाठी व अन्य शेतीकर्जासाठी वेगवेगळ्या बँकांवर कर्जरूपी बोज्यातून आपल्या शेतीचे अर्थकारण चालवीत असतात. गेल्या काही वर्षापासून राज्यातील अनेक भागात नैसर्गिक आपत्ती ओढवत असल्यामुळे शेतीचे अर्थचक्र बदलले असून शेतकऱ्यांना शेती पुरेनाशी झाली.लावलेला खर्चही निघत नसल्याने बँकांच्या कर्जाचा डोंगर वाढत गेला व जवळपास शेतकरी यामाध्यमातून कर्जबाजारी झाले. या गंभीर प्रश्नातून शेतकऱ्याची सुटका व्हावी यासाठी काही शेतकरी संघटनांनी पुढाकार घेऊन संपूर्ण राज्यात एकाच वेळी एल्गार पुकारून शेतकरी आंदोलनातून शासनाला कर्जमाफी करण्यास भाग पाडले. अखेर शासनाने कर्जमाफीची घोषणा केली मात्र तत्वतः,सरसकट व निकष लावत या कर्जमाफितून शेतकरी कसा अपात्र राहील याचेच भान ठेवले गेले.सरसकट दीड लाखाचे कर्जमाफची भाषा वापरून यातही तारखेचा घोळमेल करून पात्र शेतकऱ्यांनाही संभ्रमात टाकून कर्जमाफीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले.

आजही अनेक शेतकरी जे या कर्जमाफीत बसू शकत नाही त्यांनी तर कर्जमाफीची आशा सोडली आहे.पूर्वी २००८ मध्ये त्यावेळेसच्या शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. त्यावेळेस पण काही रेग्युलर शेतकरी असल्याने ते कर्जमाफित बसू शकले नव्हते.तेच कर्जबाजारी शेतकरी आजरोजी एनपीए झालेले आहे.त्यांना कर्जमाफीची खरी गरज असताना तारखेच्या निकषातून त्या शेतकऱ्यांना कर्जमाफितून वगळून त्यांचे सर्व प्रकारचे खाते होल्ड केले गेले आहेत. या शेतकऱ्यांनी शेतमाल विकून आरटीजिएसद्वारे टाकलेले पैसेही त्यांना मिळू शकले नाही. शासनाची ही कर्जमाफीची घोषणा हवेतच जिरणारी असून खऱ्या पात्र लाभार्थ्याला याचा खरा लाभही मिळेल की नाही याबाबत शेतकऱ्यांत सध्या संभ्रम निर्माण झाला आहे.यासाठी शासनाने सरसकट तारखेचा व सालाचा विचार न करता दीड लाखापर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे अशी मागणी शेतकरी करीत आहे.

मी २००६-०७ मध्ये पीककर्ज व इतर शेतीविषयक कर्ज बँक ऑफ महाराष्ट्रकडून घेतले आहे.नापिकीमुळे मी ते कर्ज आतापर्यंतची भरू शकलो नाही.आताच्या कर्जमाफीत फायदा होईल असे वाटत होते.मात्र  २००८ ची अट टाकून ही कर्जमाफी केल्याने मला या कर्जमाफीचा फायदा होऊ शकणार नाही. पहिल्या कर्जमाफीत रेग्युलर असल्यामुळे बसू शकलो नाही व या कर्जमाफीत सालाचा घोळ झाला.त्यात आमचा काय दोष.मी या वर्षी  शेतमाल विकला व पैसे बँकेत ट्रान्सफर केले.परंतु बँकेने खाते होल्ड केले असल्यामुळे मला ते पैसे मिळू शकले नाही.
- नितीन जाधव, शेतकरी, टाकरखेड, ता.नांदुरा.

प्रशासनचा असा आहे दावा 
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर प्राप्त याद्यांची छाननी करण्यात आली. नंतर पात्र शेतकऱ्यांच्या ग्रीन याद्या बँकांना पाठविण्यात आल्या. या ग्रीन यादीत जिल्ह्यामध्ये 2 लक्ष 22 हजार 309 शेतकरी पात्र असून यामधील 1 लाख 80 हजार 786 शेतकऱ्यांना सरसकट दीड लाखापर्यंतची कर्जमाफी देण्यात आली आहे. तसेच (ओटीएस) एकरकमी योजनेतंर्गत 41 हजार 518 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थातच ऐतिहासिक कर्जमाफी योजनेतंर्गत जिल्ह्यातील 2 लक्ष 22 हजार 309 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहे. बँकांनी कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या बँकेच्या बाहेर प्रसिद्ध कराव्या. तसेच राष्ट्रीयकृत बँकांनी कर्जमाफीचे एस एम एस संबंधित शेतकऱ्यांच्या मोबाईल क्रमांकावर पाठवावे असे आदेश यंत्रणेला दिले आहेत . पात्र सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल. 
- भाऊसाहेब फुंडकर, पालकमंत्री, बुलडाणा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com