मूल्य साखळीचे "सह्याद्री' मॉडेल राज्यभर नेणार :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

मूल्य साखळीचे "सह्याद्री' मॉडेल राज्यभर नेणार 

नाशिक : सह्याद्री फार्मचे मूल्यसाखळी मॉडेल राज्यभरात प्रत्येक पिकात उभे केले जाईल. शेतकऱ्यांच्या कंपन्या उभारण्यासाठी सर्वंकष धोरण अंमलात आणले जाईल आणि त्या माध्यमातून पुढील पाच ते सात वर्षांत महाराष्ट्राच्या शेतीचे संपूर्ण चित्र पालटलेले असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. 

मूल्य साखळीचे "सह्याद्री' मॉडेल राज्यभर नेणार 

नाशिक : सह्याद्री फार्मचे मूल्यसाखळी मॉडेल राज्यभरात प्रत्येक पिकात उभे केले जाईल. शेतकऱ्यांच्या कंपन्या उभारण्यासाठी सर्वंकष धोरण अंमलात आणले जाईल आणि त्या माध्यमातून पुढील पाच ते सात वर्षांत महाराष्ट्राच्या शेतीचे संपूर्ण चित्र पालटलेले असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. 

मोहाडी (जि. नाशिक) येथील सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीला श्री. फडणवीस यांनी शनिवारी (ता.29) भेट दिली आणि विविध शेतमालाच्या मुल्य साखळीच्या टप्प्यांची पाहणी केली. त्यानंतर राज्यभरातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, सकाळ माध्यम समुहाचे व्यवस्थापकीय संचालक व एपी ग्लोबालेचे अध्यक्ष अभिजित पवार, महापौर रंजना भानसी, जि. प. अध्यक्षा शीतल सांगळे, खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, आमदार डॉ. राहुल आहेर, सीमा हिरे, देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, माजी आमदार माणिकराव कोकाटे, सह्याद्रीचे अध्यक्ष विलास शिंदे, महाराष्ट्र सोशल व्हिलेज ट्रान्स्फार्मेशन फाऊंडेशनच्या कार्यकारी संचालक श्‍वेता शालिनी, एपी ग्लोबालेचे बॉबी निंबाळकर मंचावर उपस्थित होते. 

श्री. फडणवीस म्हणाले की, शेतकरी एकत्रित आले तर ते केवळ समस्यांवर मात करून थांबत नाहीत, तर जगाच्या बाजारपेठेवर ठसा उमटवू शकतात. हे सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने दाखवून दिले आहे. शेतमालाच्या मूल्यसाखळीचे हे मॉडेल राज्यभर नेण्याचा प्रयत्न केला जाईल. सह्याद्रीचे यश अत्यंत कौतुकास्पद असून या प्रयोगात गुंतवणूक वाढली, ताण कमी झाला. धोके टाळले गेले. उत्पादन खर्च कमी करणे शक्‍य झाले. मालाचा उच्च दर्जा राखल्याने युरोपची बाजारपेठही मिळवता आली. 
महाराष्ट्र सरकारने या दृष्टीने अनेक महत्वाची पाऊले उचलली आहेत.

नानाजी देशमुख कृषि समृध्दी प्रकल्पाच्या माध्यमातून जागतिक बॅंकेच्या मदतीने 5 हजार गावांतील शेतीत आमुलाग्र बदल घडविले जात आहेत. तीन लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षित केले जात आहे. राज्य व केंद्र सरकार अनेक नवे प्रयोग राबवित आहे. देशात 11 लाख कोटी रुपयांचे कर्जवाटप होते. पण, त्याच्या परताव्याची खात्री नाही. असे वित्तसहाय्य शेतकरी उत्पादक कंपन्यांना केले आणि सह्याद्रीचे विलास शिंदे, सकाळचे अभिजीत पवार अशी माणसे एकत्र आली तर शेतीत स्थित्यंतर घडल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास श्री. फडणवीस यांनी व्यक्‍त केला. 
 
राज्याची शिखर संस्था हवी - अभिजीत पवार 
शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी परफार्मन्स मेजरमेंट तत्वावर आधारित शिखर संस्था उभी करण्याचे आवाहन अभिजित पवार यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केले. ते म्हणाले, की भांडवल कमी पडल्याने अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या बंद पडतात. तेव्हा, या कंपन्यांना सरकारने आर्थिक ताकद दिली पाहिजे. पायाभूत सुविधा पुरविल्या पाहिजेत. शेतीत खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन द्यायला हवे. मायक्रोफायनान्स, अल्पबचत गटांच्या पुढे जाऊन या कंपन्यांच्या उभारणीसाठी "मेगा फायनान्स'ची गरज आहे. इस्रायलमध्ये वाळवंटातही स्वप्ननगरी उभी होण्यामागील कारण मोठी गुंतवणूक आहे. सह्याद्रीच्या यशकथेपासून प्रेरणा घेऊन शेती व ग्रामीण भाग समृध्द करण्यासाठी लोकसहभागातून ताकदीची व्यासपीठे तयार करावी लागतील. चीनने उभारलेल्या स्मार्ट शहरांच्या धर्तीवर भारतात मोठी स्मार्ट व्हिलेजेस उभी करायला हवीत. इंडस्ट्रीप्रमाणेच ऍग्रि 4.0 बद्दल विचार करण्याची वेळ आली आहे. या कामात सकाळ, तसेच एपी ग्लोबाले समूह योग्य ती जबाबदारी उचलायला तयार आहे. 

एक हजार कोटींचे ध्येय - विलास शिंदे 
सह्याद्री कंपनीच्या वाटचालीचा प्रवास उलगडताना विलास शिंदे यांनी सादरीकरणातून "द्राक्ष, कांदा, लिंबू, संत्रा, डाळिंब या फळपिकांतील संधी व आव्हाने याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या सहभागातून उभ्या राहिलेल्या कंपनीने कुठल्याही सरकारी मदती शिवाय 300 कोटी पर्यंतच्या उलाढालीचा टप्पा गाठला आहे. 2022 पर्यंत कंपनीने 26 हजार शेतकरी जोडण्याबरोबरच 51 हजार हेक्‍टरपर्यंत कार्यक्षेत्र व एक हजार कोटींचे ध्येय ठेवले आहे. 

महाराष्ट्र कृषि कौशल्य विकास कार्यक्रमाचे तांत्रिक सल्लागार अमोल बिरारी यांनी "महाऍग्री' संकल्पनेचे सादरीकरण केले. ऊसासह डाळिंब, पपई, धान्यपिके ते कृषिपर्यटनाच्या सातशे मूल्यसाखळीची राज्यात संधी असून साडे दहा लाख कोटी रुपये उत्पन्नाची क्षमता आहे. त्या दृष्टीने फार्म, प्रॉडक्‍ट ते मार्केट या टप्प्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. सुनील वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले. विलास शिंदे यांनी आभार मानले. 

बाजारपेठेचा दर्जा देण्याबाबत लवकरच निर्णय 
सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीत शनिवारी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. 
यात शेतकऱ्यांचा प्रश्‍नांना उत्तर देताना बाजारपेठेचा दर्जा देण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. 
चर्चेत द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष अशोक गायकवाड, ग्रेप एक्‍स्पोर्ट असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रेसिडेंट जगन्नाथ खापरे, द्राक्ष बागायदार संघ पुणेचे खजिनदार कैलास भोसले, प्रा. विलास देशमुख, रवींद्र बोराडे, रामदास पाटील यांनी सहभाग घेतला. 

माध्यमांनी जबाबदारी स्विकारावी 
अभिजित पवार म्हणाले, शेती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी माध्यमांनी जागरुक राहून जबाबदारी स्विकारण्याची गरज आहे. "ऍग्रोवन'च्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्याला उपयोगी पडेल असे नवे तंत्रज्ञान, त्यांच्या धडपडीची, प्रयत्नांची यशकथा दिली जाते. अडचणीच्या काळात शेतकऱ्याला यातून उभारीख नवी दिशा मिळते. अशी जबाबदारी आता सर्वच माध्यमांवर आली आहे. 

Web Title: marathi news cm attand in farmers meet