देशात दरवर्षी साडेअठरा हजार कोटी रुपयांचे व्यसनाधीनतेने नुकसान

योगेश पायघन
रविवार, 18 मार्च 2018

देशात 25 लाख कर्करोग रुग्ण आहेत. यातील 12 लाख पुरुष; तर 11 ते 14 लाख महिला आहेत. प्रगतशील देशात दर एक लाखात तीनशे-साडेतीनशे जण कर्करुग्ण आहेत. भारतात हेच प्रमाण एका लाखात 100 ते 110 आहे. दरवर्षी कर्करोगाच्या दहा लाख नव्या रुग्णांची नोंद होते. व्यसनामुळे कर्करोग होण्याचे प्रमाण 40 ते 50 टक्के आहे. गेल्या दहा वर्षांत व्यवसनाधीनता 10 ते 15 टक्‍क्‍यांनी वाढली. दरवर्षी आपला देश 18 हजार 500 कोटी रुपयांची क्रयशक्ती गमावत आहे. 

- डॉ. ऋषिकेश खाडिलकर, सहयोगी प्राध्यापक, औरंगाबाद. 

औरंगाबाद : मद्यपान, धूम्रपान आणि तंबाखू यांच्यासह अमली पदार्थांचे सेवनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. व्यसनाधीनतेच्या विळख्यात तरुणाईसह स्त्रियाही अडकत आहेत. व्यसनाधीनतेमुळे दरवर्षी साडेअठरा हजार कोटी रुपयांची क्रयशक्ती खर्ची पडते. व्यसनाधीनतेला रोखायचे कसे, याची चिंता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनाही आहे. 

सिगारेट, सिगार, हुक्का आणि दारू यांचे विविध प्रकार बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. शिवाय, अशा पदार्थांच्या जाहिरातींवर बंदी असूनही कायद्यातील पळवाटा शोधून या ना त्या मार्गाने जाहिराती केल्या जातात. त्यामुळे व्यसनाधीनतेला खतपाणी मिळत आहे. राज्यातच नव्हे; तर संपूर्ण देशभरात मोठी कमावती लोकसंख्या व्यसनांच्या आहारी गेल्याने आजारग्रस्त होत आहे, असे दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. पी. डांगे यांनी "सकाळ'ला सांगितले.

साधारणपणे आज 56 टक्के पुरुष मित्रांबरोबर; तर 48 टक्के स्त्रिया घराबाहेर सिगारेटचा झुरका घेतात, असे सर्वेक्षणातून समोर आले आहे. व्यसनमुक्ती किंवा तंबाखूमुक्तीच्या माध्यमातून पंधरा वर्षांत पाच टक्के ग्रामीण; तर सहा टक्के शहरी लोकांनी व्यसन सोडल्याचा दावा आहे; मात्र हे प्रमाण वाढणाऱ्या व्यसनाच्या निम्मेदेखील नाही. त्यामुळे घरातून व्यसन सोडायला पाठबळ मिळणेच गरजेचे आहे, असे मानसोपचार समुपदेशक सांगतात. 

शरीर होते कमजोर 

व्यसनांमुळे तोंड, स्वादूपिंड, घसा, नपुंसकत्व, हृदयविकार, उच्च रक्तदाब, रक्तवाहिन्यांसंबंधी रोग, फुप्फुसाचे रोग (सीओपीडी), हृदयविकार, अर्धांगवायू, स्वरयंत्राचा रोग, दृष्टिदोष, दात-हिरड्यांचे आजार होतात. स्त्रियांमध्ये हाडांची घनता कमी होणे, संधिवात, मोतीबिंदू, हिरड्यांचे आजार, जखम भरण्याच्या प्रक्रियेमध्ये विलंब, उदासीनता, अनियमित मासिक पाळी, लवकर रजोनिवृत्ती, गर्भधारणा न होणे, श्वासाचे विकार, वंध्यत्व, गर्भपात, अर्भकाच्या मेंदूवर परिणाम संभवणे असे विविध प्रकारचे आजार होतात. 

थक्क करणारी आकडेवारी 

- 34.6 टक्के प्रौढ लोक तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी 
- यातील 25.9 टक्के लोक तंबाखू चघळतात; 9.2 टक्के लोक बिडी आणि 5.7 टक्के लोक सिगारेट ओढतात 
- प्रत्येक 10 पैकी 5 लोकांना अप्रत्यक्ष धूम्रपानाचा त्रास होतो 
- यापैकी 50 टक्के त्रास घरी आणि 25 टक्के सार्वजनिक ठिकाणी होतो 
(स्रोत ः जागतिक प्रौढ तंबाखू सर्वेक्षण-2009-10) 

- जगातील एक अब्ज धूम्रपान करणाऱ्यांपैकी 20 कोटी स्त्रिया 
- धूम्रपानाने दरवर्षी 50 लाख लोक मृत्युमुखी 
- सात वर्षांत मुलींमध्ये भांग व्यसनात दहा पटींनी; तर बारा वर्षांत 15 टक्‍क्‍यांनी वाढ 
(स्रोत ः जागतिक आरोग्य संघटनेचे 2012 चे सर्वेक्षण) 

Web Title: Marathi News country Alcoholic 18000 crores losses