भुजबळांना संपवायचे आहे का? 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 6 मार्च 2018

मुंबई - समाजातील अनेक प्रश्न सोडविण्यात छगन भुजबळांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे गृह विभागाशी बोलून कायद्याच्या चौकटीत त्यांना कसा न्याय देता येईल, यासाठी प्रयत्न केले जातील, अशी खात्री विधान परिषदेत सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली. भुजबळांना संपवायचे आहे का, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. 

आर्थर रोड तुरुंगात असलेल्या भुजबळ यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जे. जे. रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांना जामिनासाठी नैसर्गिक न्याय मिळावा आणि खासगी रुग्णालयात उपचार मिळावेत, अशी विनंती औचित्याच्या मुद्याद्वारे आमदार कपिल पाटील यांनी उपस्थित केली. या वेळी उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना धडा शिकविण्याचा सरकारचा कोणताही प्रयत्न नसल्याचे स्पष्टीकरण दिले. 

धनंजय मुंडे यांनीही भुजबळ यांच्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त केली. ते म्हणाले, ""भुजबळ आताही आमदार आहेत. जे. जे. रुग्णालयात तपासणीसाठी गेल्यावर त्यांना "ओपीडी'च्या रांगेत उभे रहावे लागते. न्यायदानात जे होईल ते होईल; पण प्रशासन काय करत आहे? भुजबळांना संपवायचे आहे का?'' 

आमदार जयंत जाधव यांनीही आपले म्हणणे मांडले. भुजबळांना नैसर्गिक न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा, अशी मागणी त्यांनी केली. भुजबळ सभागृहाचे विद्यमान सदस्य असून, त्यांना दिली जाणारी वागणूक मानवतेला शोभणारी नसल्याची भावना जाधव यांनी व्यक्त केली. 

विरोधी पक्षांतील सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन सरकारने उचित कारवाई करावी, असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सरकारला दिले. 

Web Title: marathi news dhanjay mundhe Chhagan Bhujbal maharashtra