राज्यातील गावठाणांचे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सर्वेक्षण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 मार्च 2018

येरवडा - पुणे जिल्हा महसूल विभागाच्या मदतीने भारतीय सर्वेक्षण विभाग सोनोरी (ता. पुरंदर) गावठाणाचे "ड्रोन' कॅमेऱ्यांद्वारे सर्वेक्षण करून डिजिटल नकाशे तयार करणार आहे. त्यामुळे अवघ्या तीन दिवसांत खासगी, सरकारी मालमत्तेसह सरकारी मोकळ्या जागांचा नकाशा तयार होणार आहे. यामुळे गावठाणातील प्रत्येकाला प्रॉपर्टीकार्ड मिळणार आहे. या वर्षअखेर राज्यातील 43 हजार गावठाणांचा डिजिटल नकाशा तयार होणार असल्याची माहिती सर्वेक्षण अधिकारी एस. त्रिपाटी यांनी दिली. 

या संदर्भात त्रिपाटी म्हणाले, ""गेल्या दहा वर्षांत सर्वेक्षकांच्या मदतीने राज्यातील तीन हजार गावठाणांचे नकाशे तयार करण्यात आले आहेत. या प्रक्रियेत वेळ आणि पैसा अधिक लागत होता. गावठाणांचे सर्वेक्षण लवकर व्हावे म्हणून ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेण्यात येणार आहे. याचा पथदर्शी प्रकल्प म्हणून सोनोरीकडे पाहिले जात आहे. याची बैठक बुधवारी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या कार्यालयात झाली. या वेळी जिल्हा भूमी अभिलेख, महसूल विभाग, पुरंदर तालुक्‍याचे अधिकारी उपस्थित होते. 

भारतीय सर्वेक्षण विभागाच्या डेहराडूनच्या मुख्य कार्यालयातून एक पथक येणार असून, पाच मार्चला सारोळे गावठाणाचे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर येरवड्यातील भारतीय सर्वेक्षण विभागाच्या कार्यालयात छायाचित्रीकरणावर प्रक्रिया करून दोन दिवसांत डिजिटल नकाशे तयार करण्यात येणार आहेत. या नकाशांच्या आधारे गावठाणातील खासगी, सरकारी मालमत्तेच्या व सरकारी मोकळ्या जागेच्या नोंदी होणार आहेत. त्यामुळे गावठाणातील प्रत्येकाला त्यांच्या मालमत्तेची खरेदी व विक्री करणे सोपे होणार आहे. भविष्यात सरकारी मोकळ्या जागेवरील अतिक्रमणांचा प्रश्‍नच उद्‌भवणार नसल्याचे त्रिपाटी यांनी सांगितले. 

या पथदर्शी उपक्रमाच्या यशस्वितेनंतर राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 43 हजार गावठाणांचे डिजिटल नकाशे तयार होणार आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण प्रॉपर्टीकार्डधारकांची संख्या व त्यांचे क्षेत्रफळ निश्‍चित झाल्यामुळे राज्याच्या महसूल विभागाच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. 

मोकळ्या जागांच्या नोंदी 
राज्यात सध्या महसूल विभागाकडे शेतजमिनीच्या (7/12) नोंदी आहेत, तर शहरी भागात सिटी सर्व्हे विभागाकडे मालमत्तेसंबंधी नोंदी आहेत. मात्र, गावठाणांतील खासगी, सरकारी आणि मोकळ्या जागांच्या नोंदी अद्याप नव्हत्या. त्यामुळे येत्या वर्षअखरे या नोंदी होतील. त्यामुळे खऱ्या अर्थाने डिजिटल महाराष्ट्र होईल, यात शंकाच नसल्याचे त्रिपाटी यांनी सांगितले.

Web Title: marathi news Drone camera pune