शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर सरकार कोडगे

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 8 मार्च 2018

राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांविषयी वारंवार सांगूनही सरकार काहीच करत नसून, ते कोडगे बनले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत केली. अडचणीतील शेतकऱ्यांना सरकारने विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांविषयी वारंवार सांगूनही सरकार काहीच करत नसून, ते कोडगे बनले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत केली. अडचणीतील शेतकऱ्यांना सरकारने विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्या वतीने आज गारपिटीच्या प्रश्‍नावर चर्चा उपस्थित केली. या चर्चेत भाग घेताना जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवरून सरकारवर चौफेर टीकास्त्र सोडले. शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्‍न कायम असताना शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. राज्याचे कृषी खाते बेजबाबदारपणे काम करत असून, हा कृषी खात्याचा अकार्यक्षम कारभाराचा नमुना आहे, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली.

देशात अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन झाल्याने आयातीवर निर्बंधाची शेतकऱ्यांची मागणी आहे, तरीही आयात वाढत आहे. शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. सरकारने शेतकऱ्यांसाठी केंद्रे सुरू केली नसल्याने त्याचा फायदा व्यापारी उठवत आहेत. तुरीला कवडीमोल भाव दिला जात आहे. गारपिटीने शेतकऱ्यांना झोडपले असताना सरकार मदत करायला तयार नाही, असे जयंत पाटील म्हणाले.

सरकारने विशेष पॅकेज द्यायला हवे
गारपिटीचे पंचनामे करताना शेतकऱ्यांच्या हातात पाटी देण्यात आली. ही पंचनाम्याची पद्धत आहे का, असा सवाल जयंत पाटील यांनी केला. शेतकऱ्यांशी असा व्यवहार होणार असेल तर या सरकारची शेतकऱ्यांबाबत काय मानसिकता आहे, हे दिसून येते. गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने विशेष पॅकेज दिले पाहिजे. कोरडवाहू शेतीसाठी हेक्‍टरी २५ हजार; तर बागायत शेतीसाठी ५० हजार प्रतिहेक्‍टरी मदत करावी. विदर्भातील शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. सरकारने बियाणे कंपन्यांकडून पैसे वसूल करू, असे सांगितले होते; परंतु पैसे द्यायला कंपन्या वेड्या आहेत काय? कंपन्या न्यायालयात गेल्या आहेत आणि सरकारने हात वर केले आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.

Web Title: marathi news farmer jayant patil NCP maharashtra