किसान सभेच्या आंदोलनाला शिवसेना, मनसे, राष्ट्रवादीचा पाठिंबा

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 11 मार्च 2018

मुंबई/नाशिक - संपूर्ण कर्जमाफी व अन्य मागण्यांसाठी मंगळवारी, ६ मार्चला नाशिकवरून निघालेल्या महाराष्ट्र किसान सभेच्या शेतकरी लाँग मार्चला रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा जाहीर केला. सरकारविरुद्ध राज्यभर हल्लाबोल करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही नाशिक येथील सभेत शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला, तर शिवसेनेने यापूर्वीच आपला पाठिंबा जाहीर केला आहे. लाँगमार्चमध्ये मजल दरमजल करीत मुंबईत पोचलेल्या हजारो शेतकऱ्यांनी उद्या (सोमवारी) विधान भवनाला घेराव घालण्याचा इशारा दिला असल्याने आंदोलनाचा सामना कसा करायचा यावर सरकारच्या स्तरावर हालचाली गतिमान झाल्या आहेत. 

कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावे करा, कष्टकरी शेतकऱ्यांना विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती द्या, शेतीमालाला दीडपट भावाची हमी द्या आदी विविध मागण्यांसाठी निघालेला शेतकऱ्यांच्या लाँग मार्च आता मुंबईच्या वेशीवर ठाणे जिल्ह्यात पोचला आहे. किसान सभेच्या नेतृत्वाखालील हे मोर्चेकरी सोमवारी विधान भवनाला बेमुदत घेराव घालणार आहेत. 

शेतकऱ्यांच्या मागण्या

  • स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा
  • वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करा
  • पुनर्वसनाचे प्रश्न निर्माण न करता पश्‍चिमवाहिनी नद्यांचे समुद्राला मिळणारे पाणी पूर्वेकडे वळवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीसाठी द्या
  • बोंड अळी व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी ४० हजार रुपये भरपाई द्या
  • शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा
  • दुधाला किमान ४० रुपये भाव मिळेल यासाठी तातडीने हस्तक्षेप करा
  •  साखरेच्या भावात हस्तक्षेप करून उसाला कारखान्यांनी हंगाम सुरू होताना जाहीर केलेला भाव देणे बंधनकारक करा
  • विकासकामांच्या कारणाने शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याकडून काढून घेण्याचे कारस्थान बंद करा

दरम्यान, या आंदोलनाला राजकीय पक्षांकडून पाठिंबा वाढत असून, शिवसेनेपाठोपाठ शनिवारी मनसेनेही आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. शेतकऱ्यांच्या लाँग मार्चचे रविवारी (ता. ११) मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून स्वागत करण्यात येणार आहे. या वेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनीही विधिमंडळात शेतकऱ्यांचा प्रश्‍न उपस्थित केला जाणार असल्याचे सांगितले. दुसऱ्या बाजूला सरकार पातळीवर हालचाली गतिमान झाल्या असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा सुरू केली असल्याचे सांगण्यात आले.  

मुंबईमध्ये सोमवारपर्यंत (ता. १२) राज्यभरातून आणखी किमान ३० हजार शेतकरी सहभागी होणार आहेत. मोर्चाची सुरवात किसान सभेने केली असली, तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावे, हा कोणत्याही एका पक्षाचा मोर्चा नसल्याचे आवाहन किसान सभेचे सचिव कॉ. डॉ. अजित नवले यांनी ‘सकाळ’शी बोलताना केले. मनसेने मोर्चाला आज पाठिंबा दिला आहे. याआधी शिवसेनेनेही पाठिंबा जाहीर केला होता. डॉ. नवले यांनी सांगितले, की राज ठाकरेंनी या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी केवळ याच नव्हे, तर या नंतरच्याही शेतकऱ्यांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेणार असल्याचे सागितले. 

    Web Title: marathi news farmer rally Shiv Sena, MNS, NCP support mumba