नाशिकहून मुंबईकडे शेतकऱ्यांचा लाँग मार्च; विधान भवनाला घेराव 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

देवस्थानच्या जमिनी कसणाऱ्यांच्या नावे कराव्यात, ज्या वनजमिनी शेतकरी कसतात, त्या त्यांच्या नावे करण्याच्या घोषणेची अंमलबजावणी करावी, शेतीमालाला रास्त भाव मिळावा, यांसह शेतकऱ्यांचे रेंगाळलेले व प्रलंबित प्रश्न धसास लावण्यासाठी किसान सभेने या लढ्याची घोषणा केली आहे.

नाशिक - शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नसल्याच्या निषेधार्थ किसान सभेतर्फे विधान भवनला घेराव घालण्यात येणार आहे. या लढाईसाठी आज दुपारी राज्यभरातील शेतकऱ्यांचा लॉंग मार्च नाशिकहून मुंबईकडे रवाना झाला. राज्यातील लाखभर शेतकरी 12 मार्चला होत असलेल्या आंदोलनात सहभागी होतील. 

आज दुपारी येथील मध्यवर्ती बस स्थानक चौकात शेतकरी किसान सभेच्या नेतृत्वाखाली जमले. किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, आमदार जे. पी. गावित, राज्य अध्यक्ष किसन गुजर, अर्जुन आडे, सरचिटणीस डॉ. अजित नवले आदींनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

हा मोर्चा रायगडनगर (नाशिक), घाटणदेवी (इगतपुरी), कळंबगाव (शहापूर), भातसा नदी (शहापूर), मुंबई ढाबा (ठाणे), सायन/दादर (मुंबई) येथे मुक्काम करेल. 

देवस्थानच्या जमिनी कसणाऱ्यांच्या नावे कराव्यात, ज्या वनजमिनी शेतकरी कसतात, त्या त्यांच्या नावे करण्याच्या घोषणेची अंमलबजावणी करावी, शेतीमालाला रास्त भाव मिळावा, यांसह शेतकऱ्यांचे रेंगाळलेले व प्रलंबित प्रश्न धसास लावण्यासाठी किसान सभेने या लढ्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या लढ्याच्या अंतर्गत किसान सभेच्या वतीने शेतकऱ्यांचा लॉंग मार्च काढण्यात आला आहे. त्यात राज्यभरातून शेतकरी सहभागी झाले आहेत.

Web Title: marathi news farmer vidhan bhavan nashik