उस्मानाबादमध्ये 313 कोटींची कर्जमाफी

तानाजी जाधवर
रविवार, 14 जानेवारी 2018

उस्मानाबाद : जिल्ह्यातील 82 हजार 498 शेतकऱ्यांना आतापर्यंत 313 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. आता त्रुटी राहिलेल्या याद्यांवर काम होणार असून त्यासाठी जिल्हा बँकेत सोमवारी (ता. 15) कार्यशाळा आयोजित केली आहे. त्यासाठी राज्यस्तरावरून निरीक्षकही येणार आहेत. 

उस्मानाबाद : जिल्ह्यातील 82 हजार 498 शेतकऱ्यांना आतापर्यंत 313 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. आता त्रुटी राहिलेल्या याद्यांवर काम होणार असून त्यासाठी जिल्हा बँकेत सोमवारी (ता. 15) कार्यशाळा आयोजित केली आहे. त्यासाठी राज्यस्तरावरून निरीक्षकही येणार आहेत. 

शेतकऱ्यांनी भरलेली माहिती व बँकेने दिलेली माहिती यामध्ये नेमका काय बदल झाला याची पडताळणी करण्यासाठी या कार्यशाळेचा उपयोग होणार आहे. कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असली तरी त्यामध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी नव्याने कामकाज सुरू होणार आहे. सुरवातीला ग्रीन लिस्ट जाहीर करण्यात येत होती, त्यानुसार जिल्ह्यातील यंत्रणेने दिलेल्या यादीतील पात्र लोकांची पुन्हा पडताळणी करण्यात आली व नंतरच कर्जखात्यावर रक्कम वर्ग करण्यात आली. पहिल्यांदा या प्रक्रियेत मोठ्या त्रुटी आढळल्या, त्यावरून राज्य सरकारवर, सहकार खात्यावर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर संबंधित यंत्रणेकडून अत्यंत गोपनीय पद्धतीने ही प्रक्रिया राबविण्यात आली. परिणामी हिवाळी अधिवेशनात सलगपणे मोठ्या याद्या जिल्हापातळीवर येण्यास सुरवात झाली. अधिवेशनात या मुद्द्यावरून गदारोळ होणार नाही, यासाठी ही प्रक्रिया राबविण्यात आली. 

जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास 82 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे. त्यांची रक्कम 313 कोटींवर गेली आहे. यामध्ये जिल्हा बँकेच्या 37 हजार 265 सभासदांचा समावेश आहे, त्यांची रक्कम 57 कोटी 69 लाख इतकी आहे. तर राष्ट्रीयीकृत बँकेच्या 45 हजार 233 सभासदांना 233 कोटी 86 लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. आता ज्या सभासदांच्या माहितीमध्ये तफावत दिसून येत आहे, त्यांच्यासाठी वेगळी प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यासाठी राज्यस्तरीय कार्यशाळा या आठवड्यात पुण्यामध्ये पार पडली. तशीच कार्यशाळा जिल्हापातळीवर होणार व त्यानुसार तालुकास्तरीय समितीकडून त्याची पडताळणी केली जाणार आहे. 

नव्या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांनी भरलेली माहिती व बँकेने भरलेली माहिती याची पडताळणी केली जाईल. त्यानंतर शेतकरी पात्र ठरण्याचे कारण त्यामध्ये नमूद करावे लागणार आहे. तालुकास्तरीय समितीमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांकडून त्याची पडताळणी होणार आहे. 
- व्ही. एस. जगदाळे, सहायक निबंधक

Web Title: marathi news Farmers Loan waiver Devendra Fadnavis Osmanabad news