औषधोपचारासोबत हवा रुग्णांची संवाद- कोटेचा,आरोग्य विद्यापीठ सुवर्णपदकांचे वाटप 

live
live

नाशिक,  : वैद्यकीय शास्त्रातील चिकित्सक पद्धतीनुसार आपणच सुपरपॉवर आहोत. रुग्णांना आपले ऐकावेच लागेल, त्यांना औषधे दिली की बरे वाटेलच, असा समज करून घेऊ नका. डॉक्‍टर म्हणून आपण समाजातील श्रेष्ठ घटक बनणार असल्याने रुग्णांवर औषधोपचार करण्यासोबत त्यांच्याशी संवाद साधावा. रुग्णांची सर्वतोपरी सेवा करत चांगले डॉक्‍टर व्हावे, असा सल्ला नवी दिल्लीतील आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी सोमवारी (ता. 10) दिला. 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अठराव्या दीक्षान्त समारंभानिमित्त विद्यापीठातील शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीत झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर अध्यक्षस्थानी होते. या वेळी नवी दिल्लीतील भारतीय दंत परिषदेचे अध्यक्ष दिबेंदू मजुमदार, भारतीय चिकित्सा केंद्रीय परीक्षेचे अध्यक्ष वैद्य जयंत देवपुजारी, विद्यापीठाचे प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे आदी उपस्थित होते. 


वैद्य कोटेचा म्हणाले, की वैद्यकीय क्षेत्रात काम करताना पाय जमिनीवर राहतील, याची काळजी भावी डॉक्‍टरांनी घ्यावी. अहंकार न बाळगता रुग्णांशी केवळ हसून बोलला, सुसंवाद साधला तरी रुग्ण व डॉक्‍टर यांच्यातील संबंध सुधारतील. 
श्री. मजुमदार म्हणाले, की रुग्ण-डॉक्‍टर यांच्यातील कटू होत चाललेले संबंध सुधरविण्याचे आवाहन युवा डॉक्‍टरांपुढे आहे. आलेल्या प्रत्येक रुग्णाला तपासण्यासह ग्रामीण भागात सेवा देण्यावर डॉक्‍टरांनी भर द्यावा. 


श्री. देवपुजारी म्हणाले, की वैद्यकीय क्षेत्रात कार्य करताना युवा डॉक्‍टरांनी सेवाभाव विसरायला नको. 25 वर्षांपूर्वीप्रमाणे आज डॉक्‍टर व रुग्ण यांच्यातील नाते राहिलेले नाही. समाज प्रखरतेने व्यक्‍त होत असल्याची बाब गांभीर्याने घेत सुधारणांची आवश्‍यकता असल्याचे नमूद केले. जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी सूत्रसंचालन केले. 

महाराष्ट्रात मान्यतेचा प्रश्‍न गंभीर 
आयुष विभागाशी निगडित सर्वाधिक महाविद्यालये महाराष्ट्रात असून, त्या खालोखाल कर्नाटक व अन्य राज्यांचा क्रमांक आहे. वैद्यकीय शिक्षण गेल्या काही वर्षांत भरभराटीला आल्याने अनेक नवीन महाविद्यालये, नवीन शैक्षणिक संस्था सुरू झाल्या; परंतु आता मान्यतेसंदर्भात प्रश्‍न निर्माण होताहेत. आयुष मंत्रालय व विद्यापीठांनी समन्वय साधत व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याची गरज वैद्य कोटेचा यांनी व्यक्‍त केली. 

समाजाला आणखी डॉक्‍टरांची आवश्‍यकता : डॉ. म्हैसेकर 

जागतिक आरोग्य संघटने(डब्ल्यूएचओ)च्या निकषांनुसार भारतात लोकसंख्या व डॉक्‍टरांच्या प्रमाणात मोठी तफावत आहे. सुपरस्पेशालिटी डॉक्‍टरांची संख्या आजही खूप कमी आहे. समाजाला आणखी डॉक्‍टरांची आवश्‍यकता असून, शासनाने त्यादृष्टीने वैद्यकीय शिक्षणाच्या जागा वाढवायला हव्यात, असे कुलगुरू डॉ. म्हैसेकर यांनी नमूद केले. 

अनुजाला व्हायचंय "आयएएस' 

सांगलीतील गुलाबराव पाटील होमिओपॅथिक महाविद्यालयातील अनुजा बंडगर हिने सहा सुवर्णपदके पटकावली. बीएचएमएस अभ्यासक्रम पूर्ण करताना तिने एकूण 12 पदके पटकावली आहेत. बेडग (ता. मिरज) येथील अनुजाचे स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आयएएस होऊन प्रशासकीय सेवेतून समाजसेवा करण्याचे ध्येय आहे. तिचे मोठे काका अण्णासाहेब बंडगर निवृत्त पोलिस अधिकारी, लहान काका पंडितराव बंडगर कोल्हापूरला वकील, तर वडील तुकाराम बंडकर शेतकरी आहेत. मोठा भाऊ हृषीकेश एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेतोय. लहान भाऊ संदेशचा यंदा "नीट'च्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षणास क्रमांक न लागल्याने पुन्हा एकदा परीक्षा देऊन वैद्यकीय शिक्षणाचे त्याने ध्येय ठेवले आहे. दीक्षान्त समारंभाला संपूर्ण बंडगर कुटुंबीयांनी हजेरी लावत आनंदोत्सव साजरा केला. 

59 सुवर्णपदकांचे वाटप 

समारंभात आठ हजार 466 विद्यार्थ्यांना विविध आरोग्य शाखांच्या पदव्या प्रदान करण्यात आल्या. 59 सुवर्णपदकांचे वाटप या वेळी केले. अनुजा बंडगर हिने सहा सुवर्णपदके पटकावली. मुंबईतील ग्रॅंट गव्हर्न्मेंट वैद्यकीय महाविद्यालयाच्या अक्षरा दीक्षतला तीन तर उपासना घोष व निखिल पलंगेने प्रत्येकी दोन सुवर्णपदक पटकावले. सेथ जी.एस. मेडिकल कॉलेजच्या शालीन शाहला दोन सुवर्णपदक, केविन शुगुमरने दोन सुवर्णपदक पटकावले. जालन्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथील शिरीन खान हिला चार सुवर्णपदके होती. तीन पदकांसह एमबीबीएस अभ्यासक्रमात अव्वल क्रमांक तन्मय लोंढे (सेथ जी.एस.मेडिकल कॉलेज) याने पटकावला. नाशिकच्या आयुर्वेद सेवा संघाच्या आयुर्वेद महाविद्यालयातील दिव्या पाटील हिने तीन सुवर्णपदक तर आरोग्य विद्यापीठातील एंटरपॅथी रिसर्च ऍण्ड टेक्‍नॉलॉजी विभागाच्या आदिती शेराल हिने सुवर्णपदक पटकावले. एमजीव्हीच्या डेंटर कॉलेजची गायत्री मल्होत्रानेही सुवर्णपदक पटकावले. डॉ. यल्लवा कांबळे, डॉ. सायमन, डॉ. ज्ञानदेव चोपडे, वैद्य सुधीर जुवेकर, वैद्य भारती अनवेकर, वैद्य रश्‍मी काळे यांना पीएच.डी प्रदान केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com