"ती'च्या उद्योगभरारीला मिळाले पंख! 

सिद्धेश्‍वर डुकरे
गुरुवार, 8 मार्च 2018

मुंबई - महिला उद्योजकता धोरणांतर्गत स्त्रियांमधील उद्यमशीलतेला वाव देतानाच व्यवसायवृद्धीसाठी त्यांच्या पंखांना बळ देण्याच्या नवी मुंबई महापालिकेच्या प्रयत्नांना चांगले फळ मिळत आहे. व्यवसायासाठी आवश्‍यक प्रशिक्षण देत पालिकेने आतापर्यंत 40 उद्योन्मुख उद्योजिका घडवत राज्यातील इतर पालिकांपुढे आदर्श निर्माण केला आहे. या वर्षी उद्योग सुरू करण्यास उत्सुक असलेल्या आणखी 400 महिलांच्या स्वप्नांना बळ देण्याचा पालिका प्रशासनाचा मानस आहे. 

मुंबई - महिला उद्योजकता धोरणांतर्गत स्त्रियांमधील उद्यमशीलतेला वाव देतानाच व्यवसायवृद्धीसाठी त्यांच्या पंखांना बळ देण्याच्या नवी मुंबई महापालिकेच्या प्रयत्नांना चांगले फळ मिळत आहे. व्यवसायासाठी आवश्‍यक प्रशिक्षण देत पालिकेने आतापर्यंत 40 उद्योन्मुख उद्योजिका घडवत राज्यातील इतर पालिकांपुढे आदर्श निर्माण केला आहे. या वर्षी उद्योग सुरू करण्यास उत्सुक असलेल्या आणखी 400 महिलांच्या स्वप्नांना बळ देण्याचा पालिका प्रशासनाचा मानस आहे. 

यशस्वी उद्योजिका घडविण्याच्या उद्देशाने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत नवी मुंबई पालिका प्रशासनाने 3 जानेवारीला पालिका हद्दीतील महिलांना आवाहन केले होते. महापालिका आयुक्‍त डॉ. एन. रामास्वामी आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या महिला शाखेच्या अध्यक्ष शुभांगी तिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या समाज विकास विभागाच्या उपायुक्‍त तृप्ती सांडभोर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. या आवाहनास उत्तम प्रतिसाद देत सुमारे 1500 महिलांनी व्यवसाय करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यापैकी काही महिला संसाराला हातभार लावण्यासाठी छोट्या प्रमाणावर घरगुती उद्योग करीत होत्या. या महिलांपैकी 40 जणींची निवड करून त्यांना पालिकेतर्फे आठ आठवड्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये व्यवसायाची निवड, आर्थिक व्यवस्थापन, संवादकौशल्य, मार्केटिंग या व्यवसायासाठी लागणाऱ्या आवश्‍यक बाबींबरोबरच व्यक्तिमत्त्व विकासासंदर्भातील मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक महिलेच्या आवडीनुसार त्यांना उद्योग प्रशिक्षण देण्यात आले. त्यात रिअल इस्टेट, खतनिर्मिती, अन्नप्रक्रिया, ब्यूटी पार्लर, अगरबत्ती-धूप-गंध-अत्तरनिर्मिती आदी व्यवसायांचा समावेश होता. 

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या महिलांना प्रत्यक्ष व्यवसाय करण्याची संधी देण्यात आली. 7 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत विशिष्ट उद्दिष्ट देण्यात आले. सर्वच महिलांनी हे उद्दिष्ट पूर्ण केले. काहींनी तर उद्दिष्टांच्या चार पटीने व्यवसाय करून दाखविण्याची करामत केली. 

व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या उत्पादनांची निर्यात करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. या वर्षी सुमारे 500 उद्योजिका घडविण्याचा आमचा मानस आहे. 
तृप्ती सांडभोर, उपायुक्त, समाज विकास विभाग, नवी मुंबई पालिका 

घरखर्चाला हातभार लावण्यासाठी रिअल इस्टेटचा उद्योग करताना आधी महिनाकाठी सरासरी 25 हजार रुपयांची कमाई होत असे. या प्रशिक्षणानंतर उद्दिष्ट पूर्ण करताना मी एक लाख 25 हजार रुपये उत्पन्न मिळवू शकले. 
अर्चना भंडारे, उद्योजिका 

मी आधी पालिकेत कंत्राटी पद्धतीवर संगणक शिक्षक म्हणून काम करीत होते. नोकरी गेल्यामुळे माझ्यापुढे रोजगाराचा प्रश्‍न आ-वासून होता. नवी मुंबई पालिकेकडून अगरबत्ती-धूपनिर्मितीचे प्रशिक्षण घेतल्यानंतर मी व्यवसायास सुरवात केली. सध्या मला महिन्याला एक लाखापेक्षा अधिक उत्पन्न मिळते. मी पाच जणांना रोजगारही दिला आहे. 
मनीषा झिंगे, उद्योजिका 

Web Title: marathi news International Women Day women maharashtra