माय होम स्वीट होम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

महिलांनी सर्वच क्षेत्रे पादाक्रांत केलीत. आपापल्या क्षेत्रात यशाचे टप्पे ओलांडले. तरीही घर आणि संसाराकडे तिचे तितकेच दक्षतेने लक्ष असते. किंबहुना ‘माय होम-स्वीट होम’ असे अभिमानाने सांगताना त्या घरासाठी आवश्‍यक सर्व त्या जबाबदाऱ्याही तितक्‍याच नेटाने पार पाडतात. जागतिक महिला दिनानिमित्त अशाच काही प्रातिनिधिक कर्तृत्ववान महिलांविषयी...

समाजउत्थान हेच स्वप्न 
माझे कुटुंब ही नेहमीच माझी प्राथमिकता आहे. लग्नाआधीही मी विवेकानंद केंद्राचे कार्य करायची. लग्नानंतर माझ्या आवडीला पोषक वातावरणच मिळाले. १९९६ पासून संस्कार भारतीशी संलग्न आहे. २००७ पासून घरच्या जबाबदाऱ्या थोड्या कमी झाल्यानंतर मातृ सेवा संघ, सेवासदन, सक्षम या संस्थांच्या माध्यमातून पूर्णपणे सामाजिक क्षेत्रात आले. समाजउत्थान हेच आता स्वप्न आहे. नितीन गडकरी साहेब राजकीय क्षेत्रात मोठी जबाबदारी सांभाळत असताना घराचे घरपण जपत सामाजिक क्षेत्रात कांचन गडकरी म्हणून कार्य करता आले, याचे खूप समाधान आहे.  - कांचन गडकरी, नागपूर

चळवळीचे स्वरूप यावे  
माझे वडील पोलिस इन्स्पेक्‍टर होते, घरात शिस्त होती. मी मात्र दोन्ही मुलींना मुलांसारखे वाढवले. थोरली मुलगी अमेरिकेत शिकतेय. धाकटी कन्या बीईच्या दुसऱ्या वर्षाला आहे. खरे म्हणजे, महिलांना बंधन नसावे. मुलांबद्दल निर्णय घेण्याची मुभा असावी, असे वाटते. घरदेखील दोघांच्या नावावर असावे. त्याची सुरवात झाली असली तरी सर्वत्र ही चळवळ पोचावी. 
- मनीषा अहिरराव, ड्रेस डिझाईनर, नाशिक

आई आणि ताईच्या भूमिकेत आनंदी
तेवीस वर्षांपासून मी कोल्हापुरातील ‘स्वयंसिद्धा’ या संस्थेशी संबंधित आहे. सुरवातीला पणत्यांचे स्टॉल संस्थेत लावायचे. हळूहळू संस्थेसाठी अर्धवेळ काम सुरू केले. सासू, सासरे आणि पती यांचे पाठबळ मिळाले. मुळात या कामामुळे समाधान मिळायचे आणि त्याच ऊर्जेतून मी घरातही तितक्‍याच आनंददायी वातावरणात जबाबदाऱ्या पार पाडते. ‘स्वयंसिद्धा’, ‘स्वयंप्रेरिका’ या संस्थांमधून एक ताई म्हणून विविध जबाबदाऱ्याही तितक्‍याच आत्मियतेने पार पाडते. दोन्हींचा समन्वय साधण्यासाठी दररोज योगासने आणि ध्यानाची सवय फार महत्त्वाची ठरते. 
- तृप्ती पुरेकर, कार्यकारी संचालिका, स्वयंसिद्धा, कोल्हापूर

घरोघरी व्हावेत सायन्स परिवार
माझ्या चिमुकल्याचे संगोपन आणि त्याच्यावर संस्कार करताना विचार आला की, त्याच वयोगटातील आणखी काही मुलांवरही विज्ञान, पर्यावरणाचे संस्कार का करू नयेत? याच संकल्पनेतून माझ्या चिमुकल्यासोबत अनेक मुले एकत्र आली. युरेका सायन्स क्‍लबची निर्मिती झाली. शिक्षण आणि गणिताचे धडे केवळ पुस्तकापुरतेच नको तर व्यवहारातून समजून देण्याचा प्रयत्न असतो. माझे घर हाच युरेका सायन्स परिवार झालाय. त्याच धर्तीवर घराघरांत असे सायन्स परिवार व्हावेत, असे वाटते. - सुषमा केणी, युरेका सायन्स क्‍लब, कणकवली, जि. सिंधुदुर्ग

कुटुंबीयांमुळे शिक्षणाची दारे खुली 
कुटुंब हे माझे आधारस्तंभ आहे. त्याचाच मी एक भाग आहे. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे मी शिक्षण घेतले. २१ वर्षांपासून शासकीय रुग्णालयात सेवा देत आहे. आई-वडिलांमुळे मी शिक्षण घेऊ लागले. ‘एमबीबीएस’चे शिक्षण पूर्ण झाल्यावर लग्न झाले. त्यानंतर पती आणि सासरच्या मंडळींच्या पाठिंब्यामुळे माझी मुलेही उच्च शिक्षण घेताहेत. नोकरी आणि संसार यांचा समतोल राखला. पती प्रा. मिर्झा वाहब बेग, तसेच सासू-सासऱ्यांच्या पाठिंब्याने आनंदी घर उभे करू शकले.
 डॉ. सईदा अफरोज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद

कुटुंबांचे ‘स्वास्थ्य’ जपणारी डॉक्‍टर
स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून स्वत:चा दवाखाना सांभाळत पती डॉ. प्रताप गोळे यांच्या हॉस्पिटलमधील ‘आयसीयू’ विभागाचे इन्फेक्‍शन कंट्रोलिंगपासून ते एचआर विभागाचे काम पाहते. व्यवसायात स्थिरावले तरी कुटुंबातील महत्त्वाचा कणा म्हणून मी आनंदाने सर्व जबाबदाऱ्या पार पाडते. केवळ पैसा हा उद्देश न ठेवता कुटुंबाच्या भावनिक, आर्थिक, शारीरिक स्वास्थ्यासाठीही प्रयत्न करते. 
- डॉ. रंजिता गोळे, सातारा

Web Title: marathi news International Women Day women maharashtra