खडसे 21 आमदारांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

जळगाव : शुक्रवारी आप्पासाहेब पवार पुरस्कार वितरणासाठी जळगावी आलेल्या शरद पवारांचे भाजपनेते एकनाथ खडसेंनी आशीर्वाद घेतल्यानंतर दोनच दिवसांत त्यांच्यासह 21 आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची "पोस्ट' चक्क धनंजय मुंडेंच्या फेसबुक अकाउंटवर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. दरम्यान, सोशल मीडियावरील या बदनामीप्रकरणी संबंधितांची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी नाथ फाउंडेशनने केली आहे. 

दोन वर्षांपासून मंत्रिमंडळाबाहेर असलेल्या एकनाथ खडसेंची स्वपक्षाविरुद्धची नाराजी लपून राहिलेली नाही. भाजप सोडणार नाही ही ग्वाही देताना ते विविध मुद्यांवरुन सरकारवर टीका करण्याची संधी सोडत नाही. अशातच शुक्रवारी जैन इरिगेशनतर्फे आयोजित आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा खडसेंनी वाकून नमस्कार केल्याचा मुद्दा चांगलाच चर्चेत राहिला, शिवाय मुख्यमंत्र्यांनी ऐनवेळी दौरा रद्द करण्यावरही चर्चा झाली. 

फेसबुकवर पोस्टने खळबळ 
या घटनांबाबत राजकीय चर्चा सुरु असताना आज विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या फेसबुक अकाउंटवर खडसे 21 आमदारांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा मजकूर व्हायरल झाला. मुंडेंच्या अकाउंटवरील या पोस्टवर विविध सोशल मीडिया साइटवरुन प्रतिक्रिया सुरु झाल्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. जळगाव शहरातही दुपारपासून ही अफवा वाऱ्यासारखी पसरली. 

कार्यकर्त्यांची पोलिसांत तक्रार 
दरम्यान, सोशल मीडियावरील या पोस्टबद्दल खडसेंच्या समर्थकांसह नाथ फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी उपअधीक्षक रशीद तडवी यांची भेट घेऊन याप्रकरणी निवेदन दिले. खडसे पक्षातील ज्येष्ठ व एकनिष्ठ नेते आहेत. त्यांच्याविषयी अशाप्रकारे पोस्ट टाकून बदनामी केल्याप्रकरणी संबंधितांची चौकशी करावी, ज्यांच्या अकाउंटवरुन ही पोस्ट व्हायरल झाली त्या धनंजय मुंडेंची चौकशी करुन तांत्रिक बाजू तपासून पाहावी व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देताना अशोक लाडवंजारी, दीपक फालक, आदी कार्यकर्ते हजर होते.

Web Title: marathi news jalgaon khadse rashtrawadi