अपवाद वगळता बंद शांततेत; जनजीवन विस्कळीत

अपवाद वगळता बंद शांततेत; जनजीवन विस्कळीत

पुणे : जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेनंतर जाहीर 'महाराष्ट्र बंद'ला आज काही हिंसक अपवाद वगळता राज्यात प्रतिसाद मिळाला. बंदमुळे शेतमाल वाहतुकीला फटका बसला, तर राज्यातील अनेक बाजार समित्यांचे व्यवहार ठप्प राहिल्याने शेतकऱ्यांची गैरसोय झाली. 

कोरेगाव भीमा येथील दंगलप्रकरणी राज्यात डाव्या आणि दलित संघटनांकडून बुधवारी (ता. ३) बंद पुकारण्यात आला होता. यास राज्यातील बहुतांश भागांत प्रतिसाद मिळाला. संसदेतही या घटनेचे पडसाद उमटले. काँग्रेसकडून कोरेगाव भीमा येथील दंगलीचा मुद्दा लोकसभेत काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी उपस्थित केला. दलित संघटनांनी अनेक ठिकाणी रास्ता रोको केले, शहरात रॅली काढून बंदचे आवाहन केले. अनेक भागात शैक्षणिक, खासगी संस्था, खासगी आणि सरकारी वाहतूक व्यवस्था बंद होत्या, यामुळे जनजीवन विस्कळित झाले. सायंकाळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बंद मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर केले. 

                      राज्यभरातील बंदचे पडसाद...                           

दलित संघटनांचा रत्नागिरीत तीन ठिकाणी रास्ता रोको
रत्नागिरी - भीमा कोरेगाव दंगलीचे तीव्र पडसाद आज शहरात उमटले. दंगलीच्या निषेधार्थ विविध दलित संघटनांनी शहरात जयस्तंभ, बस स्थानक आणि जिल्हा रुग्णालयासमोर रास्ता रोको केला. यामुळे सुमारे साडेतीन तास वाहतूक कोंडी झाली.
..............................................................

अक्कलकोट बंद शंभर टक्के यशस्वी; शांततेत निषेध मोर्चा काढत दिले निवेदन
अक्कलकोट - कोरेगाव भीमा येथे द्विशताब्दीच्या समारोहाच्या निमित्ताने सोमवारी विजयस्तंभस्थळी अभिवादनाचा मोठा कार्यक्रम होत असतानाच कोरेगाव भीमा परीसरात अनुचित घटना घडली होती. त्याचा निषेध म्हणून आज अक्कलकोट तालुका मागासवर्गीय संघर्ष समितीच्या वतीने अक्कलकोट बंद ठेवण्यात आला होता.
..............................................................

कल्याणमध्ये चक्का जाम आंदोलन
कल्याण : कोरेगाव भीमामधील घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज बुधवारी (ता. 3) दिलेल्या महाराष्ट्र् बंदच्या हाकेला कल्याण पूर्व पश्चिम भागात चांगलेच पडसाद उमटले. अनेक भागात 4 तासाहून अधिक काळ चक्का जाम आंदोलन करत आपला निषेध व्यक्त केला. यावेळी फोटो काढणाऱ्यांना मारहाण, खासगी वाहन, एसटी बस, रेल रोको, केडीएमटी बसची तोडफोड केल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. 
..............................................................

तळेगाव दाभाडेत शांततेत बंद
तळेगाव : कोरेगाव भीमा येथील दगडफेकीच्या निषेधार्थ बुधवारी (ता.०३) पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला तळेगाव दाभाडे (ता.मावळ) आणि स्टेशन विभागात चांगला प्रतिसाद मिळाला. तळेगाव स्टेशन परिसरात व्यापारी व्यवसायिकांनी आपापली दुकाने बंद ठेवली होती.
..............................................................

दादरमध्ये आंदोलकांचा आक्रमक पवित्रा
मुंबई : भीमा कोरेगाव येथील दंगलीनंतर भारिप बहुजन महासंघाने पुकारलेल्या बंदला मुंबईत बुधवारी सकाळी संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी देखील शहरातले जनजीवन विस्कळीत झाले. प्रामुख्याने मुंबईकरांची लाइफलाइन असलेली मुंबईची लोकल आंदोलकांनी ठिकठिकाणी रोकल्यामुळे या बंदचा त्रास सामान्य नागरीकांनी आणि चाकरमान्यांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागला.
..............................................................

सोलापूरात बाजारपेठेत शुकशुकाट
कुर्डुवाडी - भिमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त जमलेल्या बौद्ध समाज बांधवांवर झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ कुर्डुवाडी मध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आला.
..............................................................

रायगड जिल्ह्यासह सुधागडमध्येही कडकडीत बंद
पाली : कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या निषेधार्थ बुधवारी (ता.३) रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. सुधागड तालुक्यातील पाली, परळी, पेडली या मोठ्या बाजारपेठा देखील बंद ठेवण्यात आल्या होत्या.
..............................................................

धुळे शहरात 'बंद'ला हिंसक वळण
धुळे: कोरेगाव भीमाच्या घटनेच्या निषेधार्थ संविधान संरक्षण समितीतर्फे पुकारण्यात आलेल्या आजच्या "बंद'ला हिंसक वळण लागले. धुळे शहरात आग्रा रोड, साक्री रोड परिसरात दुकानांवर दगडफेक करण्यात आली. शिरपूर येथे आगारात उभ्या असलेल्या दोन बसवर दगडफेक केली.
..............................................................

जंक्शनमध्ये बारामती-इंदापूर राज्यमार्गावर अडीच तास रास्तारोको 
वालचंदनगर : कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये कडकडीत बंद पाळून जंक्शन येथे बारामती-इंदापूर राज्य महामार्गावर सुमारे अडीच तास रास्तारोको आंदोलन करुन घटना घडविण्यास कारणीभूत असलेल्या मिलिंद एकबोट व संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
...............................................................

संघ कार्यालयावर दगडफेक करून कार्यालय जाळण्याचा प्रयत्न
परभणी : कोरेगाव भीमा येथील घटनेचे पडसाद सलग तिसऱ्या दिवशीही (ता. 3) परभणी शहरात पहावयास मिळाले. संपप्त जमावाने स्टेशनरोडवरील संघ कार्यालयावर दगडफेक करून कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. 


महाराष्ट्राच्या जनतेचे अभिनंदन आणि आभार. त्यांनी आमच्या भावना समजून घेतल्याबद्दल त्यांना धन्यवाद. या प्रकरणातील दोषींना सरकारने लवकर अटक करावी. 
- प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, भारिप बहुजन महासंघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com