कोरेगाव भिमा हिंसेनंतर अशी आहे महाराष्ट्रातील परिस्थिती...

Marathi News Koregaon Bhima Vadhu Budruk riot maharashtra
Marathi News Koregaon Bhima Vadhu Budruk riot maharashtra

पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रूक (ता. शिरूर) येथी विजयस्तंभ अभिवादन दिनाच्या निमित्ताने कोरेगाव भिमा येथे सोमवारी घडलेल्या दोन गटातील चकमकीचे पडसाद आज (मंगळवार) राज्यात विविध ठिकाणी उमटले आहेत. मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडलेल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नियोजित पुणे दौरा रद्द झाला आहे. राज्यात ठिकठिकाणी एसटी वाहतूक विस्कळित झालेली आहे. दरम्यान, हिंदुत्ववादी नेते संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर सणसवाडी दगडफेकीप्रकरणी पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. 

पुणे जिल्ह्यात एसटी वाहतूक विस्कळीत झालेली असून आतापर्यंत एसटीच्या सहा गाड्या फोडल्या गेल्या आहेत. पुणे-इंदापूर, अकलूज मार्गावरील वाहतूक संध्याकाळपर्यंत बंद राहिली आहे. कोरेगाव भीमा येथील झालेल्या दंगलीची उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांमार्फत चौकशीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे; शिवाय सोशल मिडीयावर अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील दोन गटांतील वाद शांत झालेला असताना विजयस्तंभ अभिवादन दिनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी दोन्ही गटांचे कार्यकर्ते कोरेगाव भीमा येथे समोरासमोर आले आणि घोषणाबाजी होऊन वाद चिघळला. त्याचे पर्यवसान दगडफेक, वाहने व मालमत्तेच्या जाळपोळीत झाले. पुणे-नगर रस्त्यावर कोरेगाव भीमा, वढू रस्ता, सणसवाडी, शिक्रापूर तसेच कोंढापुरी येथे अनेक वाहनांची तसेच रस्त्यावरील दुकानांची तोडफोड व जाळपोळ झाली. या घटनेत एक जण ठार, दोन जण गंभीर जखमी, तर काही जण किरकोळ जखमी झाले.

सोलापूर/ अकलूज : कोरेगाव भीमा येथे घटनेचे पडसाद आज (मंगळवारी) माळशिरस तालुक्‍यात उमटले. या घटनेचा निषेध व्यक्त करत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तर, श्रीपूर येथे आंदोलकांनी रस्त्यावर निकामी टायर जाळून एस. टी. बसची तोडफोड केली. श्रीपूर येथे घडलेल्या प्रकारामुळे अकलूज स्थानकातील बस सेवा दुपारपर्यंत बंद ठेवली होती. या काळात प्रवाश्‍यांना ताठकळत बसावे लागले होते. अकलूज येथील दैनदिन व्यवहार आज बंद होते. कोरेगाव भीमा आणि वढू येथील घटनांच्या निषेधार्थ गुरुवारी (ता. 4) पंढरपूर बंदचे आवाहन विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने केले आहे. त्या दिवशी सकाळी 11 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निषेध सभेचे आयोजन केले आहे. 

कऱ्हाड : शहरातील चार ते पाच ठिकाणच्या इमारतीसह दोन एसटी बससह पाच चारचाकी वाहने फोडण्यात आली. दुपारी बारा नंतर उसळलेली स्थिती आटोक्यात आणण्यासाठी अधिक पोलिसांची कुमक बोलवण्यात आली आहे. येथे जमावाने एक एसटी बस फोडली.  येथे बस स्थानक परिसरातील हाॅटेल अलंकार, काॅटेज हाॅस्पीटल परिसरातील इमारती, संकेत लॅबोरेटीज, जनता बझार, अर्बन बझारवर दगडफेक झाली. त्यात काचांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची माहिती शहरात सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. येथील बाजारपेठेतही त्यामुळे बंद पाळण्यात आला.

हडपसर (पुणे) : पुणे-सासवड रस्त्यावर अज्ञात तरूणांकडून भेकराईनगर येथे एका एसटी व पीएमपी बसवर दगडफेक करण्यात आली. सुदैवाने या घटनेत प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. ही घटना मंगळवारी दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. भेकराईनगर येथील पोलिस चौकीसमोरच ही घटना घडली. तातडीने या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. दोन्ही वाहने भेकराईनगर येथील जकात नाक्यावर हलविण्यात आली. भिमा-कोरेगाव दंगलीच्या पार्श्वभूमीवर ही दगडफेक झाली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. 

कल्याण : कोरेगाव-भीमा मधील घटनेचे पडसाद कल्याण पूर्व मध्ये उमटले, भिमसैनिकांनी रस्त्यावर उतरत रास्ता रोको, रॅली, घोषणाबाजी देत घटनेचा निषेध व्यक्त केल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते यामुळे कल्याण पूर्व मधील अनेक भागात दुकानदारांनी दुकाने बंद केल्याने अनेक भागात शुकशुकाट होता. 

वालचंदनगर : अंथुर्णे (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील ग्रामस्थांनी कोरेगाव-भीमा मध्ये घडलेला घटनेचा निषेध करुन गावामध्ये कडकडीत बंद पाळून रास्तारोको आंदोलन केले. कोरेगाव-भीमा येथे विजयस्तंभाला मानवंदना करण्यास गेलेल्या नागरिकांवर काही समाजकंटकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधात गावोगावी होऊ लागला आहे. अंथुर्णे येथील व्यापाऱ्यांनी आज (ता. २) रोजी  दिवसभर बाजारपेठा बंद ठेवल्या होत्या. आज सकाळी नागरिकांनी बारामती-इंदापूर महामार्गावर रास्तारोको आंदोलन करुन रास्ता रोखून घरुन भीमा कोरेगाव घटनेतील आरोपींना त्वरित अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. रास्तारोको आंदोलनामध्ये कालिदास साबळे, अंबादास साबळे, राहुल साबळे, अॅड. शिवराज साबळे यांनी मनोगत व्यक्त करून कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या घटनेचा निषेध केला.

अमळनेर - भीमा कोरेगाव, सणसवाडी परिसरातील दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेचे पडसाद मंगळवारी येथे आज शहरात उमटले. यात सात बसची तोडफोड झाली असून, एक चालक जखमी झाला आहे, अशी माहिती आगार प्रमुख एम. बी सैंदाणे यांनी दिली. 

जालना - शहरातील नूतन वसाहत येथे मंगळवारी (ता. दोन) अज्ञात जमावाने दगडफेक केली. यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. तरी एक खाजगी वाहन पेटून देण्यात आले.  तर पोलिसांच्या तीन व एका खाजगी गादीवर दगडफेक केल्याने काचा फुटल्या.

अकोला - वऱ्हाडातील तिन्ही जिल्ह्यात भिमा कोरेगाव घटनेचे पडसाद उमटले. अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. तिन्ही जिल्ह्यात रास्ता रोको करण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यात पोलिसांना जमावावर साैम्य लाठीमार करावा लागला.  

लातूर - भीमा - कोरेगाव येथे सोमवारी घडलेल्या घटनेचे पडसाद शहरात सकाळपासून उमटायला सुरवात झाली. शहरातील सम्राट चौक ते गुळ मार्केट रस्त्यावर लातूर आगाराच्या बसवर मंगळवारी सकाळी दगडफेक झाली. या घटनेत तीन प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रमुख  रस्त्याकडेच्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत.

जळगाव - भीमा-कोरेगाव येथे सोमवारी झालेल्या दोन गटांतील धुमश्‍चक्रीनंतर या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटत असताना जळगाव जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटले. जळगावात सोमवारी रात्री दलित संघटनांची बैठक होऊन आज सकाळी समाज मंडळातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. घटनेचा निषेध नोंदवत या घटनेची सीआयडी यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.

भीमा- कोरेगाव येथील घटनेचे पडसाद धुळे शहरात आज दुसऱ्या दिवशी देखील उमटले. सोमवारी रात्री तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर आज सकाळी भीमनगर भागात रास्तारोको करण्यात आला. तसेच महाराणा प्रताप चौक परिसरात दुकाने बंद पाडण्यात आली असून, या साऱ्या प्रकारामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसफेऱ्या देखील रद्द करण्यात आल्या. 

| Koregaon Bhima | Bhima Koregaon | 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com