राष्ट्रवादीशी आघाडीचा निर्णय अद्याप नाही: अशोक चव्हाण

हरी तुगावकर
रविवार, 4 मार्च 2018

आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. ते त्यांचे व्यक्तीगत मत आहे. संविधानाने दिलेले आरक्षण हे कायम राहिलेच पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे. आर्थिक निकष किंवा शेतकऱयांना आरक्षण या संदर्भात पक्षीय पातळीवर याची व्यापक चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले.

लातूर : राज्यात आगामी निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. राज्यातील नेते व कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्याचा अहवाल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांना देण्यात येणार आहे. श्री. गांधीच त्या बाबतीत निर्णय घेतील, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी रविवारी (ता. ४) येथे पत्रकार परिषदेत दिली. तसेच आर्थिक निकषावर आरक्षण
हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे व्यक्तीगत मत आहे. या बाबतीत काँग्रेस पक्ष पातळीवर व्यापक चर्चा करूनच नंतर निर्णय घेईल, असेही चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.

काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिबिरांच्या निमित्ताने श्री. चव्हाण येथे आले होते. शिबिराच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील नेते व कार्यकर्त्यांशी आघाडी करण्याच्या संदर्भात मत जाणून घेतली जात आहेत. राज्य पातळीवरील नेत्यांना देखील आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर याचा अहवाल श्री. राहूल गांधी यांना सादर केला जाईल. तेच आघाडीसंदर्भात निर्णय घेतील असे ते म्हणाले.

आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. ते त्यांचे व्यक्तीगत मत आहे. संविधानाने दिलेले आरक्षण हे कायम राहिलेच पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे. आर्थिक निकष किंवा शेतकऱयांना आरक्षण या संदर्भात पक्षीय पातळीवर याची व्यापक चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले.

विविध राज्यातील निवडणुकात काँग्रेसचा पराभव होत आहे. ही खऱी गोष्ट आहे. त्याला श्री. राहूल गांधी हे जबाबदार आहेत किंवा त्यांचे नेतृत्व लोकांना मान्य नाही असे म्हणता येणार नाही. ती राज्य व स्थानिकच्या नेत्यांची जबाबदारी असते. पोटनिवडणुकात पक्षाला मोठे यश आले आहे हे विसरता येणार नाही, असे श्री. चव्हाण म्हणाले.

सध्याचे राज्य सरकार बोलण्यात आॅनलाईन व कृतीत आॅफ लाईन आहे. तेराशे शाळा बंद केल्या जात आहेत तर दुसरीकडे दारुच्या दुकानांना परवानगी दिली जात आहे. राज्यात सामाजिक स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे.शेतकऱयांच्या मालाला भाव बेरोजगार तरुणाला काम दिले तर मंत्रालयात जाळ्या लावण्याची वेळ येणार नाही, असे श्री. चव्हाण म्हणाले. यावेळी माजी केंद्रीयमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, विधानसभेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजीमंत्री दिलीपराव देशमुख,  हर्षवर्धन पाटील, अमित देशमुख आदी उपस्थित होते.

Web Title: Marathi news Latur news Ashok Chavan statement on NCP alliance