कर्जांच्या विळख्यात सार्वजनिक बॅंका

कर्जांच्या विळख्यात सार्वजनिक बॅंका

मुंबई - पंजाब नॅशनल बॅंकेच्या कर्ज गैरव्यवहाराची सर्वत्र चर्चा सुरू असतानाच मागील पाच आर्थिक वर्षांत सार्वजनिक बॅंकांमध्ये तब्बल ६१ हजार २६० कोटी रुपयांचे (९.५८ अब्ज डॉलर) कर्ज गैरव्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती रिझर्व्ह बॅंकेच्या (आरबीआय) अहवालातून समोर आली आहे. बॅंकांना एकूण ८ हजार ६७० कर्ज प्रकरणांमध्ये आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. 

‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने माहिती अधिकारात रिझर्व्ह बॅंकेकडून ही माहिती मिळवली आहे. कर्जदारांकडून बॅंकांची फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत. यातील अनेक कर्जे थकल्याने बॅंकांचे बुडीत कर्जांचे प्रमाणदेखील विक्रमी पातळीवर पोचले आहे. ‘आरबीआय‘च्या माहितीनुसार ३१ मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षापर्यंत मागील पाच आर्थिक वर्षाच्या कालावधीत सार्वजनिक बॅंकांमधील ८ हजार ६७० कर्ज प्रकरणांमध्ये बॅंकांची फसवणूक झाल्याचे अहवालात म्हटले आहे. मागील पाच आर्थिक वर्षात बॅंकांमधील कर्ज गैरव्यवहारांमध्ये वाढ झाल्याचे ‘आरबीआय‘ने म्हटले आहे. २०१२-१३ या वर्षात बॅंकांमध्ये ६ हजार ३५७ कोटींचे गैरव्यवहार झाले होते. तेव्हापासून हा आकडा वाढत आहे. मागील आर्थिक वर्षात (२०१६-१७) गैरव्यवहारांमुळे बॅंकांना १७ हजार ६३४ कोटींचा फटका सहन करावा लागला आहे. 

वाढत्या गैरव्यवहारांमुळे वित्त सेवा क्षेत्रातील जोखीम वाढली असल्याचा इशारा रिझर्व्ह बॅंकेने जून २०१७ च्या आर्थिक स्थिरता अहवालामध्ये दिला होता. बॅंकांकडून कर्ज वितरण करताना नियमावलीचे उल्लंघन, कागदपत्रांची पुरेसी छाननी न झाल्याचे दिसून आल्याचे ‘आरबीआय‘ने नमूद केले आहे. नफा आणि रोख रकमेचे व्यवस्थापन करण्याबाबत जागरूक नसणे, कर्जाची रक्कम इतर कामांसाठी वापरणे, दुहेरी वित्तसाहाय्य आणि पतसंदर्भातील अनुशासनाचा अभाव यांसारखे कारणे गैरव्यवहारांना कारणीभूत ठरली आहेत. थकीत कर्जांची माहिती जाहीर करण्याबरोबरच त्यांची प्रभावीपणे वसुली करणे आणि गैरव्यवहाराचा प्रकरणांना थकीत कर्जे दाखवून दिशाभूल करू नये, असा इशारा आरबीआयने बॅंकांना दिला आहे. 

एक लाख किंवा त्याहून अधिक कर्ज घेतलेल्या कर्जांमध्ये झालेल्या गैरव्यवहारांची माहिती आहे. प्रत्यक्षात देशभरातील कर्ज गैरव्यवहारांची आणि त्यातील आर्थिक नुकसानीचा आकडा मोठा असण्याची शक्‍यता आहे. 

‘पीएनबी’त सर्वाधिक गैरव्यवहार 
‘आरबीआय’ने २१ पैकी २० सार्वजनिक बॅंकांची माहिती उपलब्ध केली. यामध्ये पंजाब नॅशनल बॅंकेत ३८९ कर्ज गैरव्यवहार झाले असून, यात ६ हजार ५६२ कोटींची फसवणूक झाली. त्याखालोखाल बॅंक ऑफ बडोदामध्ये ३८९ कर्ज गैरव्यवहार झाले असून, यात ४ हजार ४७३ कोटी बुडाले. बॅंक ऑफ इंडियामध्ये २३१ गैरव्यवहार झाले असून, यात ४ हजार ५० कोटींचे नुकसान झाले. गेल्या पाच वर्षांत भारतीय स्टेट बॅंकेत १ हजार ६९ आर्थिक गैरव्यवहार झाले. मात्र, यात किती कोटींचे नुकसान झाले, हे बॅंकेने जाहीर केलेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com