मॅग्नेटिक महाराष्ट्रची दमदार सुरवात

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 February 2018

मुंबई - मॅग्नेटिक महाराष्ट्र २०१८ च्या अंतर्गत महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटीच्या माध्यमातून मॅरेथॉन पद्धतीने विविध १५ कंपन्या व संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आले. यानुसार तब्बल एक लाखाहून अधिक रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा आहे. 

आज या माध्यमातून केलेले सर्व १५ सामंजस्य करार फक्त कागदावरच राहणार नसून, त्यासाठी आपण सर्व एकत्रितरीत्या जबाबदार सामाजिक घटक म्हणून काम करूया. त्यांची उत्तम प्रकारे अंमलबजावणी करून प्रगतशील देश घडवू, असे प्रतिपादन राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी या कार्यक्रमात केले.

मुंबई - मॅग्नेटिक महाराष्ट्र २०१८ च्या अंतर्गत महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटीच्या माध्यमातून मॅरेथॉन पद्धतीने विविध १५ कंपन्या व संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आले. यानुसार तब्बल एक लाखाहून अधिक रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा आहे. 

आज या माध्यमातून केलेले सर्व १५ सामंजस्य करार फक्त कागदावरच राहणार नसून, त्यासाठी आपण सर्व एकत्रितरीत्या जबाबदार सामाजिक घटक म्हणून काम करूया. त्यांची उत्तम प्रकारे अंमलबजावणी करून प्रगतशील देश घडवू, असे प्रतिपादन राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी या कार्यक्रमात केले.

हे सामंजस्य करार इंडस्ट्री लिंक कार्यक्रमाचा भाग असून, अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या नामांकित संस्थांचा यात समावेश आहे. विविध उद्योगांमध्ये काम करण्यासाठी महिलांना कौशल्य मिळण्यासाठी स्वीडिश चेंबर ऑफ कॉमर्स, एससीसीआय आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यातून ११० गरजूंना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील; तर साताऱ्याच्या रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येईल. याचा कालावधी तीन वर्षांचा असून, एक हजार ८०० गरजूंना याचा लाभ होणार आहे. टाटा टेक्‍नॉलॉजीज आणि विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीयल हबच्या माध्यमातून संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रात प्रशिक्षण देण्यात येईल.

एक वर्षाच्या कालावधीत याचा लाभ शेकडो तरुणांना होणार आहे. अंजुमन-इस्लाम शिक्षण संस्था तंत्रज्ञान, संगणक या क्षेत्रात प्रशिक्षण देऊन सहा हजार गरजूंना रोजगार देणार आहे. महिंद्रा सुटेन कंपनीच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रात तब्बल दोन हजार ४०० जणांना प्रशिक्षित करून रोजगार उपलब्ध केला जाईल.

‘महाराष्ट्र म्हणजे महत्त्वाकांक्षी महाराष्ट्र’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांचा दृष्टिकोन बदलला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची कामगिरी उंचावली असल्याचे रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितले. न्यू इंडिया आणि न्यू महाराष्ट्राच्या उपक्रमातून मुंबई चौथ्या औद्योगिक क्रांतीचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्‍वास अंबानी यांनी व्यक्‍त केला. प्रत्येक ग्रामपंचायत, शाळा, रुग्णालयांना जिओ सेवेशी जोडले जाईल, असे त्यांनी सांगितले. चौथी उद्योग क्रांती सामाजिक आणि आर्थिक, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संरक्षण, कृषी आदी क्षेत्रांतील समस्या सोडविण्यात फायदेशीर ठरेल, असे त्यांनी सांगितले.

सरकारच्या कामगिरीवर उद्योजकांची स्तुतिसुमने
धोरणांमध्ये सुधारणा करून गुंतवणुकीला चालना देणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीवर बड्या उद्योजकांनी स्तुतिसुमने उधळली. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलनातील ‘एमएमआरडीए‘ मैदानावर रविवारी संध्याकाळी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र- कन्व्हर्जन्स-२०१८’ या गुंतवणूक परिषदेचे शानदार उद्‌घाटन झाले. या वेळी जागतिक पातळीवरील बड्या उद्योजकांनी राज्यातील गुंतवणुकीबद्दल राज्य सरकारला आश्‍वस्त केले.

राज्य सरकारने येत्या एक लाख कोटी डॉलरपर्यंत अर्थव्यवस्था वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार राज्यात विविध क्षेत्रांतील गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. दोन वर्षांपूर्वी मुंबईत झालेल्या ‘मेक इन इंडिया’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत ८ लाख कोटींचे सामंजस्य करार झाले. या वेळी भारतातील, तसेच जागतिक पातळीवरील उद्योजकांनी राज्य सरकारच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले. त्याचबरोबर राज्यातील प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याचे आश्‍वासन दिले. स्वीडनच्या उच्च सचिव करिन रोडिंग, मुकेश अंबानी, व्हर्जिन समूहाचे अध्यक्ष रिचर्ड ब्रासनन, इमर्सन समूहाचे प्रमुख एडवर्ड मॉन्सर, रतन टाटा, आनंद महिंद्रा, बाबा कल्याणी, ह्योसंगचे प्रमुख ह्योन जून चो आणि पॉस्को इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक गिल हो बॅंग आदींनी भाषणे केली.

विकासाची पंचसूत्री राबवणार - मुख्यमंत्री
कृषी विकास, पायाभूत सुविधांवर भर, उद्योगांसाठी धोरणात्मक सुधारणा, दुर्लक्षित क्षेत्रांचा विकास आणि एमएमआर व जेएनपीटी परिसरात महामार्गांचे जाळे या विकासाच्या पंचसूत्रीद्वारे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ठरल्यापेक्षा पाच वर्षे आधीच म्हणजे २०२५ मध्येच एक लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेचा (ट्रिलिअन डॉलर इकोनॉमी)चा पल्ला गाठेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. पंतप्रधानांच्या न्यू इंडिया व्हिजनमध्ये महाराष्ट्र विश्‍वासार्ह भागीदार होईल, अशी ग्वाहीही फडणवीस यांनी दिली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेचे उद्‌घाटन झाल्यावर मुख्यमंत्री बोलत होते. दोन वर्षांपूर्वी झालेल्या ‘मेक इन इंडिया’मध्ये आठ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले होते. आतापर्यंत त्यातील ६१ टक्के म्हणजे सुमारे पाच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक प्रत्यक्षात झाली आहे. ७२ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पातून उत्पादनही सुरू झाले आहे, तर एक लाख ६६ हजार कोटींचे प्रकल्प पूर्णत्वाच्या विविध टप्प्यांमध्ये आहेत. 

सेवा वाहतुकीची व्याख्या बदलणार : ब्रासनन
पुणे-मुंबईमधील अंतर अवघ्या १० ते २० मिनिटांपर्यंत कमी करण्याच्या दृष्टीने ‘व्हर्जिन हायपरलूप वन’ सेवा फायदेशीर ठरणार आहे. मी पुणे-मुंबई हायपरलूप प्रकल्पाबाबत खूपच आशावादी असल्याचे व्हर्जिन हायपर लूप वन चे अध्यक्ष रिचर्ड ब्रासनन यांनी सांगितले. पुणे-मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाला जोडणारी हायपरलूप सेवा जलद ठरणार आहे. २१ व्या शतकातील अत्याधुनिक दळणवळण यंत्रणा व्हर्जिन हायपरलूप वन सेवा भारतात उपलब्ध होणार आहे.

महाराष्ट्राचे भविष्य उज्ज्वल : टाटा
टाटा समूहाची सुरुवात महाराष्ट्रातूनच झाली आहे. १८७७ मध्ये जमशेदजी टाटा यांनी नागपूरमधून वस्त्रोद्योग सुरू केला. मुंबई आणि महाराष्ट्र हे टाटाच्या अनेक कंपन्यांचे माहेरघर आहे. दुर्दैवाने गेल्या काही वर्षांत राज्यात म्हणावा तसा पायाभूत सेवा सुविधांचा विकास झाला नाही, मात्र नव्या सरकारच्या प्रयत्नांतून विकास दिसून येत असल्याचे सांगत टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी राज्य सरकारच्या कामगिरीचे कौतुक केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Magnetic Maharashtra 2018 Devendra Fadnavis Maharashtra Skills Development Society