सरकारची ‘उद्दिष्ट्यपूर्ती’

सरकारची ‘उद्दिष्ट्यपूर्ती’

मुंबई - उद्योगस्नेही धोरणे आणि त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जागतिक गुंतवणूकदारांचे आकर्षण ठरलेल्या महाराष्ट्राने मंगळवारी औद्योगिक क्षेत्रात आणखी एक मैलाचा दगड पार केला. मुंबईत सुरू असलेल्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉर्न्व्हजन्स’ या गुंतवणूक परिषदेत राज्यात १२.१० लाख कोटी रुपयांचे ४१०६ सामंजस्य करार झाले. त्यातून ४० लाख रोजगार निर्माण होणार आहेत. 

या परिषदेला उद्योजकांकडून भरभरून चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा सरकारने केला आहे. या परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारने १० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवले होते.  या परिषदेचा मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या उपस्थितीत समारोप झाला. फडणवीस यांनी या वेळी गुंतवणुकीविषयी माहिती दिली. ते म्हणाले, की परिषदेत एकूण ४ हजार १०६ सामंजस्य करार झाले. त्या माध्यमातून राज्यात १२ लाख १० हजार ४६४ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. सर्वांत जास्त गुंतवणूक उद्योगक्षेत्रात (पाच लाख ४८ हजार १६६ कोटी) होणार आहे. गृह निर्माण क्षेत्रात तीन लाख ८५ हजार कोटी, तर ऊर्जाक्षेत्रात एक लाख ६० हजार २६८ कोटींची गुंतवणूक होणार आहे. सरकारच्या विविध पायाभूत प्रकल्पांचे १०४ सामंजस्य करार झाले असून, त्या माध्यमातून तीन लाख ९० हजार ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्याद्वारे दोन लाख ६ हजार २६६ रोजगार निर्मिती होणार आहे. संरक्षण आणि हवाई उद्योगासाठी  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. 

लातूर येथे सुमारे ३५० एकर जागेवर रेल्वे कोच निर्मिती कारखाना प्रस्तावित असून, त्या माध्यमातून ६० हजार रोजगार निर्माण  होतील, असेही फडणवीस यांनी सांगितले. २००४ ते २०१४ या पाच वर्षांत महाराष्ट्रात रेल्वे विकासासाठी पाच हजार ८५७ कोटी रुपये गुंतवले होते; मात्र त्यानंतर आतापर्यंत २४ हजार ४०० कोटी रुपये महाराष्ट्रासाठी देण्यात आल्याची माहिती गोयल यांनी दिली.

लातूरमधून मेट्रो कोचची निर्मिती होणार असून, हे डबे देशभरातील मागणी पूर्ण करतील. त्याचबरोबर निर्यातही केली जाईल, असेही ते म्हणाले. गडचिरोली, हिंगोली, नांदेड, परभणी, नंदुरबार यांसारख्या औद्योगिकदृष्ट्या अविकसित भागात गुंतवणूक होणार आहे, अशी माहितीही या वेळी देण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या वेळी ‘सहभाग’ वेबपोर्टलचे अनावरण करण्यात आले. ‘सहभाग’च्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्व निधीचा (सीएसआर) वापर सामाजिक विकासासाठी करता येणार आहे. या परिषदेला उद्योगमंत्री सुभाष देसाई, कौशल्यविकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, मुख्य सचिव सुमित मल्लिक, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल आदी उपस्थित होते. 

भारताच्या विकासात महाराष्ट्र ग्रोथ इंजिन आहे. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार ही दोन इंजिने सोबत काम करीत असल्याने देशाचा बुलेट ट्रेनच्या वेगाने विकास होईल. 
- पीयूष गोयल, रेल्वेमंत्री
 

प्रमुख गुंतवणूक करार आणि प्रकल्प 
रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड - ६० हजार कोटी
व्हर्जिन हायपरलूप वन - ४० हजार कोटी
थ्रस्ट एअरक्राफ्ट क्‍लस्टर (अमोल यादव) - ३५ हजार कोटी
जेएसडब्ल्यू इलेक्‍ट्रिक व्हेइकल - ६ हजार कोटी
ह्योसंग कंपनी - १२५० कोटी
महिंद्रा इलेक्‍ट्रिक व्हेईकल - ५०० कोटी

क्‍लस्टर विकासामुळे एमएसएमई उद्योगांना चालना 
राज्यात क्षेत्रनिहाय क्‍लस्टर विकसित केले जाणार आहेत. त्यामुळे मध्यम, सूक्ष्म आणि लघु उद्योगांना फायदा होणार आहे. त्याचा थेट रोजगार निर्मितीला हातभार लागणार आहे. सिंधुदुर्ग येथे   कॉयर क्‍लस्टर विकसित होणार असून, ७.५६ कोटींची गुंतवणूक होणार आहे. रायगड जिल्ह्यात चामडे उद्योगाचे क्‍लस्टर असून, त्यासाठी ५०० कोटींची, पालघरमध्ये चित्रावारली फाउंडेशन आर्ट ॲण्ड क्राफ्ट क्‍लस्टरसाठी एक कोटींची गुंतवणूक, नागपूरमध्ये इलेक्‍ट्रॉनिक क्‍लस्टरसाठी  पाच कोटींची गुंतवणूक होईल. अहमदनगरमध्ये गोल्ड ज्वेलरी क्‍लस्टर विकसित केले जाणार आहे. 

मराठवाड्यात विकासाची गंगा 
लातूरमध्ये मेट्रोसाठी लागणाऱ्या डब्यांच्या (कोच फॅक्‍टरी) निर्मितीचा प्रकल्प होणार आहे. त्याचबरोबर अमरावतीमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज टेक्‍सटाईल हब विकसित केले जाणार आहे. औरंगाबादमधील शेंद्रा बिडकीन या औद्योगिक वसाहतीत अनेक कंपन्यांनी गुंतवणुकीचे करार केले आहेत. औरंगाबाद, नांदेड, हिंगोली आदी जिल्ह्यांमध्ये उद्योग सुरू होणार आहेत. त्यामुळे मराठवाड्यात विकासाची गंगा वाहणार आहे.

दृष्टिक्षेपात ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ 
- एकूण करार - ४ हजार १०६
- गुंतवणूक : १२,१०,४०६ कोटी 
- रोजगार : ३६ लाख ७७ हजार १८५

क्षेत्रनिहाय गुंतवणूक (कोटी रुपयांमध्ये)
- उद्योग : ५ लाख ४८ हजार १६६
- गृह निर्माण : ३ लाख ८५ हजार
- ऊर्जा : १ लाख ६० हजार 
- उच्च शिक्षण -  २ हजार ४३६  
- महाआयटी - ५ हजार ७०० 

पायाभूत प्रकल्पांसाठी सरकारची तीन लाख हजार कोटींची गुंतवणूक
- वाहतूक आणि बंदरे (४८ प्रकल्प) -  ५९ हजार ३२ कोटी
- सार्वजनिक बांधकाम (५ प्रकल्प) - १ लाख २१ हजार ५० कोटी
- मुंबई महानगरपालिका (१८ प्रकल्प) - ५४ हजार ४३३ कोटी
- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (३० प्रकल्प) - १ लाख ३२ हजार ७६१ कोटी
- नगर विकास (३ प्रकल्प) - २३ हजार १४३ कोटी

गुंतवणूकदारांनी मराठवाड्याला जास्त प्राधान्य दिले आहे. या भागात ऊर्जा, कारखाना, उत्पादन, वस्त्रोद्योग कृषी आदी क्षेत्रांत हजारो कोटींची गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे या भागातील रोजगाराला चालना मिळेल. सरकार यापुढे ‘इंटेन्शन टू इन्व्हेस्ट’ आणि ‘अप्रूव्हड इन्व्हेस्टमेंट’ या दोन गोष्टींवर भर देईल. 
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

दोन वर्षांपूर्वी झालेल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहात आठ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले होते. त्यापैकी दोन वर्षांत ६१ टक्के सामंजस्य करार प्रत्यक्षात कार्यरत झाले. महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य असून,  ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या पार्श्वभूमीवर सरकारने १३ विविध धोरणे जाहीर केली. त्याला उद्योजकांनी चांगला प्रतिसाद दिला. 
- सुभाष देसाई, उद्योगमंत्री  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com