राज्यभरात संतापाचा उद्रेक; शेतकरी उतरला रस्त्यावर

Farmers strike in Maharashtra Marathi News Nashik Photo
Farmers strike in Maharashtra Marathi News Nashik Photo

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक संपाला सुरवात झाली असून, शेतकऱ्यांकडून विविध माध्यमांतून आंदोलन करण्यात येत आहे. काही ठिकाणी भाजीपाला फेकून, तर रस्त्यावर दूध ओतून आपल्या मागण्यांसाठी बळीराजा आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहचवत आहे. नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, औरंगाबाद, नांदेड या जिल्ह्यांमध्ये संपामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात संपाची तीव्रता जाणवते आहे. 

शेतात जाणाऱ्या बळिराजाने नांगर खाली ठेवला असून पहिल्यांदाच संपाचे हत्यार उपसले आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील ऐतिहासिक शेतकऱ्यांच्या बेमुदत संपाला बुधवारी मध्यरात्रीपासून सुरवात झाली. शेतकरी कर्जमाफी आणि शेतीमालाला योग्य भाव या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. शेतकरी संपावर जात असल्याने दूध, भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर 60 ते 70 टक्‍के परिणाम होण्याची शक्‍यता आहे. 

आज पहाटे शिर्डी, मनमाड, नगर, सातारा याठिकाणी शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून आंदोलनाला सुरवात केली. सरकारच्या विविध विभागांमधील समन्वय अभावामुळे शहरातील दूध, भाजीपाला पुरवठ्यावर संपाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. सकाळपासून आंदोलनाची धार तीव्र होत गेली. काही ठिकाणी गाड्या फोडल्याचेही वृत्त आहे. 

नाशिक : येवल्यात शेतीमाल फेकला रस्त्यावर
येवला टोल नाक्यावर भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वाहनांतून माल खाली ओतला. तसेच येवला, नगरसूल, सायगाव येथे हजारो लीटर दूध रस्त्यावर ओतले. सायगाव येथे माधव भंडारी यांचा पुतळा तसेच कर्जवसुलीच्या नोटिसा जाळल्या व रास्ता रोको करण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली.

औरंगाबाद बाजार समितीत संपावरुन मारहाण
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीत संपात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यासाठी गेलेले अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सुर्यवंशीसह पाच जणांना फळभाजीपाला मार्केटमधील व्यापारी, विक्रेत्यांनी मारहाण केली. मारहाणीनंतर एका शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला शासकीय रुग्णालय (घाटीत) उपचारासाठी) नेण्यात आले. थोडासा भाजीपाला, फळ फेकण्यात आल्याने येथील अनेक व्यापारी संतप्त झाल्याने त्यांनी ही मारहाण केली. यानंतर औरंगाबाद बाजार समितीत पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

कोल्हापुरात विक्री बंद पाडण्याचा प्रयत्न
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतीमाल विक्री बंद पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. रघुनाथदादा पाटील यांचे समर्थक जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष ऍड माणिक शिंदे व सहकारी आक्रमक झाले होते. शेतकऱ्यांकडून विक्री होत असलेल्या वस्तू फेकून देण्यात आल्या.

नांदेडमध्ये शेतमाल रस्त्यावर टाकून शेतकऱ्यांचा संताप
नांदेड शहराच्या दिशेने दूध आणि भाजीपाला घेऊन जाणारी वाहने अडविण्यात आली आहेत. शेतकरी आपला शेतमाल रस्त्यावर टाकून संताप व्यक्त करत संपात सहभागी झाले.

शिर्डीत रस्त्यावर ओतले दूध
शेतकरी कर्जमाफी आणि शेतीमालाला योग्य भाव या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या करत शेतकरी संप सुरु झाला आहे. याचाच परिणाम म्हणून शिर्डीतील शेतकऱ्यांनी टँकरमधील दूध रस्त्यावर ओतून आंदोलन केले.

साताऱयात दुधाचे टँकर फोडले
कोल्हापूरहून मुंबईकडे जात असलेले वारणा दूधाचे टँकर मध्यरात्री साताऱ्याजवळ फोडण्यात आले. या संपाला हिंसक वळण लागू नये, यासाठी पोलिसांनी महामार्गावर बंदोबस्तात वाढ केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com