अहमदनगरचे उपमहापौर छिंदम यांची पक्षातून हकालपट्टी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

''छिंदम यांना पक्षातून बडतर्फ केले असून, त्यांना पदावरून काढले आहे. तसेच त्यांनी राजीनामाही दिला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा मी आणि पक्षाकडून तीव्र शब्दांत निषेध करतो''.

- दिलीप गांधी, भाजप खासदार

अहमदनगर : उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी कर्मचार्‍याला उद्देशून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्यानंतर पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ''छिंदम यांना पक्षातून बडतर्फ केले असून, त्यांना पदावरून काढले आहे. तसेच त्यांनी राजीनामाही दिला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा मी आणि पक्षाकडून तीव्र शब्दांत निषेध करतो'', असे भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी सांगितले. 

छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले होते. त्यांच्या त्या वक्तव्यावरून प्रचंड तेढ निर्माण झाला आहे. त्यानंतर पक्षाकडूनही त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचे खासदार गांधी यांनी सांगितले. ते म्हणाले, ''आजची ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत नाही तर राष्ट्राचे महापुरूष आहेत. त्यांच्याबद्दल आपल्या शहराच्या उपमहापौरांनी केलेल्या वक्तव्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. फक्त एवढ्यावर न थांबता छिंदम यांना पक्षातून बडतर्फ केले आणि त्यांना पदावरूनही काढले आहे. तसेच त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांची ही कृती अत्यंत दुर्दैवी आहे. भारतीय जनता पक्ष अशी कृती परत सहन करणार नाही''. 

दरम्यान, या प्रकाराचा पक्षाकडून निषेध केला जात आहे. तरी नागरिकांनी शांतता बाळगावी आणि कायदा सुव्यवस्था राखावी, असे आवाहनही गांधी यांनी यावेळी केले.

Web Title: Marathi News Maharashtra News Ahmednagar BJP Shripad Chindam has suspended