मुख्यमंत्री महोदय तुम्ही एका एकाचे काटे काडाय लागलायं: अजित पवार

ब्रह्मा चट्टे
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठी अनुवाद नसल्याच्या प्रकारबद्दल निषेध नोंदवत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सरकारवर टीकास्त्र सोडताना म्हणाले, " सरकारचा हा गलथान कारभार आहे. संसदिय कार्यमंत्री गैरहजर आहेत. त्यांना याबाबत जबाबदार धरा. याची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करा. राज्याच्या इतिहासात अशी पहिल्यांदाच घटना घडली आहे. सरकारचा कारभार कसा भोंगळ चालला आहे याचे हे उदाहरण असल्याचा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला. 

मुंबई : राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठी अनुवाद नसल्याच्या मुद्द्यावर सत्ताधारी व विरोधकांमध्ये विधानसभेत जोरदार घमासान झाले. मराठीचा आवमान झाल्याचा मुद्दा लावून धरत विरोधकांकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे गटनेते जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार प्रहार केले. त्यावेळी सत्ताधारी बाकावरून सरकारची बाजू वित्तमंत्री सुधिर मुनंगटीवार यांना लावून धरली. 

राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठी अनुवाद नसल्याच्या प्रकारबद्दल निषेध नोंदवत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सरकारवर टीकास्त्र सोडताना म्हणाले, " सरकारचा हा गलथान कारभार आहे. संसदिय कार्यमंत्री गैरहजर आहेत. त्यांना याबाबत जबाबदार धरा. याची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करा. राज्याच्या इतिहासात अशी पहिल्यांदाच घटना घडली आहे. सरकारचा कारभार कसा भोंगळ चालला आहे याचे हे उदाहरण असल्याचा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला. 

राज्यपालांच्या अभिभाषणाचे मराठी अनुवाद प्रसंग ओळखून शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला. त्यामुळे सरकारला धारेवर धरत माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील म्हणाले, " हे विधानमंडळ विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींचे आहे. आजचा प्रकार हा सर्वांना कमीपणा आणणारा आहे. शिक्षणमंत्री तावडे यांनी अनुवाद करते वेळी अध्यक्ष सभापती यांची परवानगी घेतली होती का हा खुलासा झाला पाहिजे. विधान मंडळाच्या हक्कावर अतिक्रमण करू शकत नाहीत, त्यामुळे या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी दिलीप वळसे पाटील यांनी केली.

यावर वळसे पाटील यांना थांबवत विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले, "असं त्यांनी काहीही केलेले नाही. कुणाच्याही हक्कावर मंत्र्यांनी गदा आणलेली नाही. " 

झाल्याप्रकाराबद्दल मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या वतीने माफी मागितली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे गटनेते जयंत पाटील म्हणाले, "मराठी भाषेचा खून करायचा अन् विधानसभेत येवून माफी मागायची हे योग्य नाही. मराठी भाषेचा आज अपमान झाला आहे. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते यांच्याकडून राजीनाम्याची अपेक्षा होती मात्र ते व त्यांचे शिवसेनेतील सहकारी मात्र काहीच न करता गप्पं बसून राहिले. किमान राजीनाम्याची धमकी तरी द्यायला हवी होती असा चिमटा जयंत पाटील यांनी शिवसेने आमदारांना काढला.

जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर वित्तमंत्री सुधीर मुंनगंटीवार यांनी जोरदार अाक्षेप घेतला. मोठ्या आवाजातच सुधीर मुनंगटीवर गर्जले," जयंतराव ज्ञानेश्वरांच्या मराठीचा उल्लेख तुम्ही खून झाला असा कसा करू शकता. तुम्हाला कळायला हवं. तुम्हीच मराठीच अवमान करत आहात. जयंतरावांचे वक्तव्य पटलावरून काढून टाकण्यात यावे.

यानंतर जयंत पाटील यांचे वक्तव्य पटलावरून काढून टाकण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते अजित पवार मुख्यमंत्र्यांना डिवचताना म्हणाले, " सुधिरभाऊंनी आक्षेप घेतल्यावर ते ओरडून बोलत होते. त्यांच्या घसा बसला असता. त्यांचा आवाज दाबला गेला असता. यावेळी मुख्यमंत्री महोदय तुम्ही हस्तक्षेप करायला हवा होता. मुख्यमंत्री महोदय तुम्ही एका एकाचे काटे काडाय लागलाय. मुख्यमंत्री महोदय तुम्ही सुधिरभाऊला थांबवायला हवे होते. तुम्हाला सुधिरभाऊ नकोयत का ? असा चिमटा अजित पवार यांनी काढला. त्यामुळे विधानसभेत एकच हशा पिकली. या प्रकरणी योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची घोषणा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी केल्याने शोक प्रस्तावाला सुरवात करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news Maharashtra news Ajit Pawar criticize Devendra Fadnavis