औरंगाबादच्या कचराप्रश्‍नी सरकारची पंचसूत्री योजना

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 14 मार्च 2018

मुंबई - औरंगाबादच्या कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने विशेष पंचसूत्री योजना तयार केली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्‍यक असलेला निधीही राज्य सरकारने उपलब्ध करून दिला असल्याचे ते म्हणाले.

औरंगाबाद शहरातील कचरा प्रश्न पेटला आहे. आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईबाबतची वस्तुस्थिती जाणून घेऊन त्याबाबतचे सविस्तर निवेदन राज्य सरकारतर्फे करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली.

औरंगाबादच्या कचऱ्याचा प्रश्न आज विधानसभेत पुन्हा एकदा चर्चेला आला. औरंगाबाद येथील मिटमिटा परिसरात झालेल्या घटनेनंतर सर्वसामान्य लोकांवर अन्याय्य पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्याला जबाबदार असलेल्या पोलिस आयुक्तांची बदली करण्याची मागणी औचित्याच्या मुद्द्याद्वारे सदस्य संजय शिरसाट आणि इतर सदस्यांनी केली.

त्यावर खुलासा करताना फडणवीस म्हणाले, की नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी या प्रकरणी संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची एक बैठक घेऊन विशेष पंचसूत्री योजना तयार केली आहे. त्यासाठी आवश्‍यक निधी सरकारने पुरवला आहे. पोलिस कारवाईबाबतची वस्तुस्थिती जाणून घेऊन त्याबाबतचे सविस्तर निवेदन केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिले.

Web Title: marathi news maharashtra news aurangabad garbage issue government