भिडे गुरुजींवरही कारवाई करा - विखे पाटील

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 15 मार्च 2018

मुंबई - 'कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मिलिंद एकबोटे यांचा जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने अटक केली; मात्र भिडे गुरुजींवर कारवाई का होत नाही, यावरून पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसते. एकबोटे यांच्याप्रमाणे भिडे गुरुजींवरही तातडीने कारवाई व्हायला हवी,'' अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी केली.

ते म्हणाले, 'कोरेगाव भीमामधील दंगल राज्य सरकार पुरस्कृत होती, असा आरोप आम्ही सातत्याने करत आहोत. एकबोटेना अटक करण्यात पोलिसांनी दाखवलेल्या दिरंगाईतून आमचा आरोप स्पष्ट झाला आहे. एकबोटे आम्हाला सापडत नाहीत, असे पोलिस सर्वोच्च न्यायालयात सांगतात. दुसरीकडे, मला पोलिसांनी बोलावलेच नाही, असा दावा एकबोटे करतात. यातून सर्व काही स्पष्ट होते.'' सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज प्रलंबित असताना एकबोटे सापडत नाहीत, असे सांगणाऱ्या पोलिसांना जामीन अर्ज नामंजूर झाल्याबरोबर त्यांचा पत्ता कसा सापडतो?, असा सवालही त्यांनी केला.

भिडेंना अटक कधी? - चव्हाण
कोरेगाव भीमामधील दंगलीचे मुख्य सूत्रधार मिलिंद एकबोटे यांना सरकारने नाईलाजाने अटक केली. "कोम्बिंग ऑपरेशन'मध्ये हजारो दलित माता-भगिनी, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांना रात्री-अपरात्री अटक करताना मागे-पुढे न पाहणारे सरकार या प्रकरणातील दुसरे मुख्य आरोपी मनोहर भिडे यांना केव्हा अटक करणार, असा प्रश्‍न कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बुधवारी केला.

Web Title: marathi news maharashtra news bhide guruji crime radhakrishna vikhe patil