विरोधकांनो, घरून येताना जरा 'टॉनिक' घेऊन यात जा : भाजप आमदार बोंडे

ब्रह्मा चट्टे
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

अनिल बोंडे म्हणाले, " पहा तुमचा आवाज सुध्दा कमी झाला. घरून येताना जरा टॉनिक घेवून येत जा. तुम्हीला माहित नसेल तर मला विचारा मी सांगतो कोणतं टॉनिक घ्यायचं !

मुंबई : विधानसभेच्या कामकाजाची आज सुरवात होताच विरोधकांनी गोंधळ घातल्याने तीनवेळा विधानसभेचे कामकाज तहकूब करावे लागले. यावेळी भाजप आमदार अनिल बोंडे विरोधकांवर चांगलेच बरसले. विरोधकांनो विरोध करण्यासाठी टॉनिक घेवून येत जा! असे म्हणत अनिल बोंडे यांनी विरोधकांना डिवचले.

आज अर्थसंकल्पीय आधिवेशाच्या तिसऱ्या दिवशी कामकाजाला सुरवात होताच विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील नियम 57 अन्वये आणि 97 अन्वये शेतकरी प्रश्नांच्या प्रस्तावावर चर्चा करण्याची मागणी केली. त्याला अध्यक्षांनी नकार देताच विरोधकांनी गोंधळ घातल कामकाज दोनवेळा बंद पाडले. दुसऱ्यांदा तहकुबीनंतर कामकाज सुरू होताच. भाजप आमदार अनिल बोंडे यांनी नियम 293 अन्वये बोंडआळी व गारपिठीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रस्तावाचे पुन्हा वाचन सुरू केला. त्यावेळी विरोधकांनी वेलमध्ये उतरून गोंधळ घालण्यास सुरवात केली.

यावेळी हरकतीचा मुद्दा घेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, " आमच्या नियम 97 अन्वये चर्चा करत प्रश्नोत्तराचा तास रद्द करा म्हणून मागणी केली होती. म्हणून तुम्ही प्रश्नोत्तराचा तास रद्द केला आहे. त्यामुळे आमच्या प्रस्तावावर चर्चा करा, "त्यावर अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले, "तुम्ही चर्चेची मागणी केली, त्यावर मी चर्चा सुरू केली आहे. तुम्ही खाली बसा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच चर्चा सुरू आहे. तुम्ही ऐकून घ्या. जाग्यावर बसा. अनिल बोंडे तुम्ही प्रस्तावावर चर्चा सुरू करा. " 

भाजप आमदार अनिल बोंडे म्हणाले, "विरोधकांचे शेतकऱ्यांवरच प्रेम किती ढोंगी आहे ते कळतयं. शेतकरी प्रश्नावर चर्चा सुरू असताना ते गोंधळ घालत आहेत. विरोधक वैफल्यग्रस्त आहेत. त्यांच्याकडे मुद्दे नाहीत त्यामुळे ते गोंधळ घालत आहेत. राज्य सरकार एक महिन्याच्या आत नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहोत. राज्यात गारपीट झाल्यानंतर लगेचच पंचनामे केले गेले आहेत. विरोधकांच्या काळात गारपीटीच्या नुकसान भरपाईपोटी जेवढे पैसे मिळत होते. त्यापेक्षाही जास्त मदत हे सध्याचे सरकार देत असल्याचा दावा अनिल बोंडे यांनी केला. 

यावेळी विरोधकांचा वेलमध्ये उतरून सरकारचा निषेध सुरूच होता. आमदार अनिल बोंडे आकडेवारीसहित माहिती देत असल्याने विरोधकांचा आवाज कमी झाला होता. त्याकडे लक्षवेधत अनिल बोंडे म्हणाले, " पहा तुमचा आवाज सुध्दा कमी झाला. घरून येताना जरा टॉनिक घेवून येत जा. तुम्हीला माहित नसेल तर मला विचारा मी सांगतो कोणतं टॉनिक घ्यायचं ! " त्यावर चिडलेल्या विरोधकांचा गोंधळ वाढल्याने तिसऱ्यांदा 15 मिनीटांसाठी विधानसभेचे कामकाज तहकूब केले.

Web Title: Marathi news Maharashtra news BJP mla Anil Bonde statement