मोपलवारांवरून फडणवीस, बाबा-दादा यांच्यात जुंपली

टीम ई सकाळ
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

मोपलवार असो किंवा कोणीही असो सरकार कोणाला पाठीशी घालणार नाही. विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत याची चौकशी केली जाईल.
- गिरीश बापट

मुंबई : आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्या ऑडिओ क्लिपवरून आज (बुधवार) विधिमंडळ सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात जुंपली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोपलवार यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, की मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेवर प्रश्न चिन्ह उपस्थित झालेले आहे. कालपासून सरकारने त्या अधिकाऱ्याला बोलविले आहे का? अजून तो अधिकारी त्या पदावर कसा काय बसून आहे? मंत्रालयात पैसे कोणाला दिले जातात? चपराशी किंवा ड्रायव्हरला तर पैसे दिले जात नाही ना?

मुख्यमंत्री म्हणाले, की अधिकाऱ्यांवरचे सर्व आरोप हे तुमच्या काळातले आहेत. मी बाबांना विचारतो, तुम्ही काय झोपला होता तेव्हा? त्यांना सर्व महत्त्वाची पदे तुमच्या काळात मिळाली आहेत. एका महिन्यात या सर्व प्रकरणाची चौकशी केली जाईल, दोषी आढळले तर कारवाई केली जाईल.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की सोशल मीडियावर एका आयएएस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होते. कोट्यवधींच्या जमिनीचा व्यवहार प्रकरणी तात्काळ या अधिकाऱ्याला निलंबित केले पाहिजे. एका निवृत्त न्यायधीशांमार्फत चौकशी केली पाहिजे. अन्यथा सभागृह चालू देणार नाही. पारदर्शक कारभाराची भाषा मुख्यमंत्री करतात. मग अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला का सरकार पाठीशी घालताय. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी याविरोधात पुरावे दिले आहेत.

विखे पाटील म्हणाले, अधिकारी मंत्र्यांना मूर्ख ठरवत आहेत. प्रकाश मेहता यांनी सभातुहात कबुली दिली आहे. त्यांचा राजीनामा घ्या. खडसे यांनी वेगळा न्याय आणि मेहतांना वेगळा न्याय का? मोपलवार यांनी करोडोची माया संपादन केली आहे. त्यांना निलंबित करा.

मोपलवार असो किंवा कोणीही असो सरकार कोणाला पाठीशी घालणार नाही. विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत याची चौकशी केली जाईल.
- गिरीश बापट

 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

 

Web Title: marathi news Maharashtra news corruption charges against Mopalwar